Iran Israel War : पश्चिम आशियात तणाव वाढला असताना भारताला काहीसा दिलासा मिळाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार इराणनं भारताला होर्मुझ सामुद्रधुनीतून दोन एलपीजी टँकर नेण्याची परवानगी दिली आहे. इराणच्या भारतातील राजदूतांनी यासंबंधी वक्तव्य केल्यानंतर काहीच तासांमध्ये हा निर्णय झाला आहे. त्यामुळे एलपीजी सिलेंडरच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे देशात निर्माण झालेली तणावाची स्थिती काहीशी निवळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेच्या युद्धामुळे इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केली होती. त्याचा परिणाम भारतात झाला असून देशांतर्गत इंधनाचा पुरवठा अपुरा पडताना दिसतोय. त्या पार्श्वभूमीवर भारतात व्यावसायिक गॅसच्या पुरवठा बंद करण्यात आला असून घरगुती गॅस सिलेंडर पुरवठ्याला प्राधान्य देण्यात आलं आहे. आता इराणमधून येणाऱ्या टँकर्समुळे या परिस्थितीत दिलासा मिळाला आहे. एलपीजी पुरवठ्याबाबत देशात चिंता व्यक्त होत असताना हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय.
Hormuz Strait LPG Tanker: दोन टँकरना सुरक्षित मार्ग
शुक्रवारी (13 मार्च) भारतामधील इराणचे राजदूत मोहम्मद फतहाली यांनी संकेत दिले होते की भारताला जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला जाईल. भारत हा आमचा जुना मित्र देश आहे आणि आम्ही या समस्येचं समाधान करण्याचा प्रयत्न करत आहोत असंही ते म्हणाले होते.
Indian Ships Gulf: आखाती परिसरात भारतीय जहाजं
भारत सरकारच्या शिपिंग मंत्रालयातील अधिकारी राजेश कुमार सिन्हा यांनी सांगितलं की, पर्शियाच्या आखातात भारतीय ध्वज असलेली 24 जहाजं आहेत, ज्यावर 677 भारतीय नाविक कार्यरत आहेत. तर होर्मुज सामुद्रधुनीच्या पूर्वेकडील ओमानच्या आखातात सध्या 3 भारतीय ध्वज असलेली जहाजं असून त्यावर 76 भारतीय नाविक आहेत. याशिवाय संपूर्ण खाडी परिसरात सुमारे 23 हजार भारतीय नाविक विविध जहाजांवर काम करत आहेत.
Iran Statement Hormuz : होर्मुज सामुद्रधुनी बंद नाही
भारतामधील इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी सांगितलं की होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्यात आलेली नाही. सध्याच्या परिस्थितीमुळं काही जहाजांना मार्गक्रमण करण्यात अडचणी येत असल्या तरी काही जहाजं अजूनही या मार्गाने जात आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
LPG Supply India: घाबरून सिलेंडर बुक करू नका
दरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये एलपीजी सिलेंडरसाठी नागरिक रांगा लावत असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र केंद्र सरकारनं नागरिकांना पॅनिक बुकिंग करू नये, असं आवाहन केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं की, 5 मार्चपासून देशातील घरगुती एलपीजी उत्पादनात 30 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तसंच देशातील 25 हजार वितरकांपैकी कुठेही एलपीजी स्टॉक संपल्याची अधिकृत माहिती नाही, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असंही त्यांनी सांगितलं.
ही बातमी वाचा:
