Inflation : महागाईचा भडका अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू; पिकवणाऱ्याला भाव नाही, ग्राहकांना परवडत नाही
Inflation Crisis : दूध, सीएनजी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. दुसरीकडे कांदा आणि साखरेच्या प्रश्नांमुळे शेतकरीही आर्थिक संकटात सापडला आहे.

Inflation Crisis : एकीकडे पंतप्रधानांनी काटकसरीचे आवाहन केलं आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य जनता महागाईच्या वणव्यात होरपळत आहे. दूध, सीएनजी आणि अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने नागरिकांचे मासिक बजेट कोलमडलं आहे. तर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला त्याने पिकवलेल्या मालाला योग्य दर मिळत नसल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
पिकवणाऱ्याला योग्य मोबदला मिळत नाही आणि खरेदी करणाऱ्याला वस्तू परवडत नाहीत, असा गंभीर विरोधाभास सध्या देशात पाहायला मिळत आहे. यामुळे महागाईचा फटका ग्राहक आणि शेतकरी या दोघांनाही बसत असल्याचं चित्र आहे.
Wholesale Inflation : घाऊक महागाईने गाठला 42 महिन्यांतील उच्चांक
घाऊक महागाईचा दर 8.30 टक्क्यांवर पोहोचला असून हा गेल्या 42 महिन्यांतील उच्चांक मानला जात आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या महागाईचा दर 6.36 टक्क्यांवरून 9.17 टक्क्यांवर गेला आहे. खाद्यपदार्थांची महागाई 1.85 टक्क्यांवरून 1.98 टक्क्यांवर पोहोचली आहे.
Fuel And Energy Prices : इंधन आणि ऊर्जेच्या किमतीत मोठी वाढ
इंधन आणि ऊर्जेच्या महागाईचा दर 1.05 टक्क्यांवरून थेट 24.71 टक्क्यांवर पोहोचला आहे. उत्पादित वस्तूंच्या महागाईतही वाढ होऊन हा दर 3.39 टक्क्यांवरून 4.62 टक्क्यांवर गेला आहे. अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने महागाईचा दबाव आणखी वाढत आहे.
Milk Price Hike : दुधाच्या दरात वाढ
अमुल आणि मदर डेअरी यांनी दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे घरगुती खर्चात आणखी वाढ झाली आहे.
CNG Price Increase : मुंबईत सीएनजी महाग
मुंबईत सीएनजीचा दर प्रति किलो 2 रुपयांनी वाढून 84 रुपयांवर पोहोचला आहे. याचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर आणि त्यानंतर विविध वस्तूंच्या किमतींवर होत आहे.
Onion Price Crisis : कांद्याला किलोमागे फक्त 1 रुपया
कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे. 20 क्विंटल कांद्याच्या उत्पादन आणि वाहतूक खर्चासाठी सुमारे 2,900 रुपये खर्च येतो. मात्र संभाजीनगरच्या लासूर बाजारात शेतकऱ्याच्या हातात पडले फक्त 2,000 रूपये. म्हणजे किलोमागे फक्त 1 रूपया. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा संयम सुटणं साहजिकच आहे. कांद्याला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पुरतं कोलमडलं आहे.
Sugar Export Ban : साखर निर्यातीवर निर्बंध
देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेच्या निर्यातीवर 30 सप्टेंबरपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखानदारांबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजीचा सूर आळवलाय . केंद्रानं शेतकऱ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय का? असा प्रश्न कोल्हापुरातील शेतकरी विचारत आहेत.
Farmer Income Crisis : शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलं
कांदा, साखर आणि इतर पिकांना योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलं आहे. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभाव घसरल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे.
Economic Reality : ग्राहक आणि शेतकरी दोघेही संकटात
महागाईचा भार सर्वसामान्यांच्या खिशावर पडत असताना शेतकऱ्यांनाही त्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील हा विरोधाभास अधिक तीव्र होत असून ग्राहक आणि उत्पादक दोघेही संकटात सापडले आहेत.
ही बातमी वाचा :
Before You Go
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल





















