जम्मू-काश्मीरमध्ये मेजर कौस्तुभ राणेंसह चार जवान शहीद
एबीपी माझा वेब टीम | 07 Aug 2018 11:58 AM (IST)
दहशतवादी एलओसी (नियंत्रण रेषा) पार करुन घुसखोरी करणार असल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली होती. चकमकीत चार भारतीय जवान शहीद झाले.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा सामना करताना एका मेजरसह चार जवानांना वीरमरण आलं. यामध्ये मुंबईजवळच्या मीरा रोडमधील मेजर कौस्तुभ राणे शहीद झाले. दहशतवादी एलओसी (नियंत्रण रेषा) पार करुन घुसखोरी करणार असल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली होती. त्यानंतर भारतीय जवान सतर्क झाले. मात्र अचानक दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाला. गोळीबारात 29 वर्षीय मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह मनदीप सिंग रावत, हमीर सिंग, विक्रम जीत सिंग हे जवान शहीद झाले. घटनास्थळाहून दोन दहशतवाद्यांचे मृतदेहही ताब्यात घेण्यात आले आहेत, तर शोधकार्य अजूनही सुरु आहे. आणखी दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने शोधकार्य सुरुच आहे. मात्र यावर भारतीय सैन्याकडून अधिकृत माहिती येणं बाकी आहे. या जवानांची नावं आणि इतर माहिती अद्याप समजू शकलेली नाही.