Couple Missing: लग्नानंतर हनिमूनसाठी मेघालयला गेले; नवविवाहीत जोडपं झालं गायब, पतीचा मृतदेह सापडला खोल दरीत तर पत्नी सोनम 14 दिवसांपासून बेपत्ता
Couple Missing: 23 मे रोजी सकाळी होमस्टेमधून चेक आउट केल्यानंतर दोघेही बेपत्ता झाले. 24 मे रोजी सोहरीम येथे त्याची भाड्याने घेतलेली स्कूटर बेवारस अवस्थेत आढळली.

Couple Missing: मेघालयातील इंदौर येथील नवविवाहित जोडपे राजा रघुवंशी याच्या हत्येनंतर त्यांची पत्नी सोनम अजूनही बेपत्ता आहे. या प्रकरणात, रघुवंशी समुदाय आणि कुटुंबाने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मृत राजाचा भाऊ विपिन रघुवंशी यांनी ही मागणी केली आहे, त्याचबरोबर स्थानिक पोलिसांच्या तपासावर त्यांचा विश्वास नसल्याचे सांगितले आहे.
राजा रघुवंशी आणि सोनम यांचं लग्न 11 मे रोजी झालं होतं, त्यानंतरर ते 20 मे रोजी हनिमूनसाठी मेघालयला गेले. 22 मे रोजी ते शिलाँगजवळील मावलाखियात गावात पोहोचले आणि नोंग्रिट गावातील शिप्रा होमस्टे येथे राहिले. 23 मे रोजी सकाळी होमस्टेमधून चेक आउट केल्यानंतर दोघेही बेपत्ता झाले. 24 मे रोजी सोहरीम येथे त्याची भाड्याने घेतलेली स्कूटर बेवारस अवस्थेत आढळली. 2 जून रोजी वायसावाडोंग धबधब्याजवळील एका खोल दरीत राजा रघुवंशी याचा मृतदेह आढळला आणि त्याच्या उजव्या हातावरील 'राजा' असा टॅटू असल्याने त्याची ओळख पटली. मेघालय पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले, परंतु अद्याप सोनम बेपत्ता असल्याची माहिती आहे.
सोनमचे अपहरण झाले असावे
विपिन रघुवंशी यांनी माध्यमांना सांगितले की, "आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करत आहोत. स्कूटी सापडलेल्या ठिकाणापासून 25 किलोमीटर अंतरावर राजाचा मृतदेह आढळला. आम्हाला संशय आहे की त्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. सोनमचे अपहरण झाले असावे. स्थानिक पोलिस पहिले 8 दिवस या प्रकरणी गंभीर नव्हते." त्याचबरोबर कुटुंबाने आरोप केला आहे की, राजाची सोन्याची साखळी, हिऱ्याची अंगठी, ब्रेसलेट आणि पाकिट गायब आहे, ज्यामुळे चोरी आणि खून झाल्याचा संशय निर्माण झाला आहे.
पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात रघुवंशी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन सीबीआयकडून चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. विपिन म्हणाले, "आमची सून सोनमला कोणत्याही परिस्थितीत जिवंत शोधले पाहिजे. या हत्येचे सत्य बाहेर यावे अशी आमची इच्छा आहे. स्थानिक टोळ्या आणि स्कूटर भाड्याने घेतलेल्या व्यक्तीचा यामध्ये हात असू शकतो असाही संशय कुटुंबातील व्यक्तींनीबोलून दाखवला आहे.
मुसळधार पाऊस आणि दुर्गम भूभागामुळे शोधकार्य कठीण
मेघालयचे मुख्यमंत्री यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे आणि न्यायाचे आश्वासन दिले आहे. पूर्व खासी हिल्सचे एसपी विवेक सायम म्हणाले, "हे खुनाचे प्रकरण दिसून येत आहे. आम्ही हत्येत वापरलेले 'दाओ' (धारदार शस्त्र) आणि राजा यांचा मोबाईल जप्त केला आहे. सोनमला शोधण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने 150 चौरस किलोमीटर परिसरात शोध मोहीम सुरू आहे. मुसळधार पाऊस आणि दुर्गम भूभागामुळे शोधकार्य कठीण होत आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
दरम्यान, इंदूरमध्ये राजा यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान, त्यांच्या घराबाहेर पोस्टर लावण्यात आले होते, ज्यावर लिहिले होते, "राजाचा आत्मा म्हणत आहे, मी मेलो नाही, मला मारण्यात आले. सीबीआय चौकशी झाली पाहिजे." आता सर्वांचे लक्ष पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेकडे आणि सीबीआय चौकशीकडे लागले आहे.





















