IndiGo Flight Emergency Landing: इंडिगोचं एक विमान बंगळुरुच्या विमानतळावर उतरवावं लागलं. इंडिगोच्या विमानाच्या पायलटनं चेन्नईला पोहोचण्यापूर्वीच विमानात इंधन कमी असल्यानं बंगळुरु एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे मेडे कॉल दिला होता. यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाला आणि विमान बंगळुरुच्या विमानतळावर उतरवण्यात आलं. सूत्रांच्या माहितीनुसार इंडिगोच्या फ्लाइटनं (6E6764) आसामच्या  गुवाहाटी येथून चेन्नईसाठी उड्डाण केलं होतं. मात्र, ते बंगळुरुत उतरवावं लागलं. 

पायलटकडून बंगळुरु एटीसीला लो फ्यूल मेडे कॉल

इंडिगोच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फ्लाइटला सुरुवातीला लँड करण्यासाठी क्लिअरन्स मिळाला नव्हता. यानंतर पायलटनं बंगळुरु एटीसीला लो फ्यूल मेडे कॉल दिला. पायलटनं एटीसीला कळवलं की फ्लाइटमध्ये फ्यूल कमी आहे, यासाठी आम्हाला प्राधान्य देऊन लँडिंग करण्यास परवानगी द्या. यानंतर इंडिगोच्या फ्लाईटला काल रात्री 8.20 वाजता बंगळुरु विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग साठी परवानगी देण्यात आली.  

168 प्रवाशांच्या सुरक्षेसाठी टीम सज्ज  

गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये एकूण 168 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. विमानानं मेडे कॉल दिल्यानंतर बंगळुरु एअरपोर्टवर विमानाच्या लँडिंगची तयारी तातडीनं करण्यात आली. विमानाच्या लँडिंग वेळी वैद्यकीय टीम आणि फायर सर्व्हिसेसची पथकं तैनात करण्यात आली होती. विमानाचं सुरक्षित लँडिंग झाल्यानं सर्वांना दिलासा मिळाला.  

इंधन भरल्यानंतर विमान चेन्नईकडे रवाना

विमानाचं सेफ लँडिंग झाल्यानं सर्व प्रवासी सुरक्षित होते. विमान लँड झाल्यानंतर प्रवाशांना रिफ्रेशमेंट देण्यात आली. याचवेळी इंडिगोच्या फ्लाइटमध्ये रिफ्यूलिंगची प्रक्रिया करण्यात आली. विमानातील क्रू बदलण्यात आला त्यानंतर विमान रात्री 10.24 मिनिटांनी बंगळुरु विमानतळावरुन चेन्नईकडे रवाना झालं. 

तांत्रिक समस्येमुळं इंडिगोचं विमान माघारी बोलावलं

शुक्रवारी 20 जून रोजी चेन्नईहून मदुराईला जाणारं इंडिगोचं विमान तांत्रिक अडचणीमुळं चेन्नईत परत बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी विमानात 68 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. विमानातील तांत्रिक अडचणीची माहिती मिळताच प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन पायलटनं विमान चेन्नईकडे वळवून सेफ लँडिंग केलं.