Indian Railways : रेल्वेचा रिझर्व्हेशन चार्ट आता 4 नव्हे तर 8 तास आधीच कळणार, वेटिंग लिस्टच्या प्रवाशांना दिलासा, तात्काळ तिकिट बुकिंगमध्येही मोठा बदल
Indian Railways Reservation Chart : 1 जुलै 2025 पासून भारतीय रेल्वे तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार आवश्यक करणार आहे. तसेच आरक्षण चार्ट हा 8 तास आधी तयार होणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला असून 1 जुलै 2025 पासून तात्काळ तिकीट बुकिंगसह चार्ट तयार करण्याच्या वेळेत आणि रेल्वे भाड्यातही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. रेल्वे प्रवाशांचा आरक्षण चार्ट हा प्रवासाच्या आधी 8 तास जाहीर केला जाणार आहे. तो आधी प्रवासाच्या 4 तास जाहीर केला जायचा. रेल्वेच्या या नव्या नियमामुळे वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या प्रवाशांना त्याची माहिती आधीच मिळणार आहे. त्यामुळे त्यांना पर्यायी मार्ग निवडण्यासाठीही पुरेसा वेळ मिळणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रस्तावांना मंजुरी देत संबंधित अधिकाऱ्यांना अंमलबजावणीसाठी निर्देश दिले आहेत.
रेल्वेने जाहीर केलेले महत्त्वाचे बदल
- ट्रेन सुटण्याच्या 8 तास आधी आरक्षण चार्ट
- रेल्वे बोर्डाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, आता प्रवासी ट्रेनच्या सुटण्याच्या 8 तास आधी आरक्षण चार्ट तयार केला जाणार आहे.
- प्रतीक्षा यादीत बदलांचा अंदाज आधीच मिळणार
- रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना तिकीट कन्फर्म होणार की नाही याची माहिती लवकर मिळेल आणि इतर पर्याय निवडण्यास वेळ मिळेल.
- तात्काळ तिकीट फक्त आधार लिंक यूजर्ससाठीच
- 1 जुलैपासून तात्काळ तिकिटे फक्त आधार लिंक असलेल्या IRCTC खात्यांवरच बुक करता येणार.
रेल्वे भाड्यात वाढ
नॉन-एसी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रति किमी 1 पैसा आणि एसी क्लासमध्ये प्रति किमी 2 पैसे भाडेवाढ होणार आहे. 500 किमीपर्यंत द्वितीय श्रेणी आणि एमएसटी प्रवाशांना कोणताही परिणाम होणार नाही.
या बदलांचा परिणाम काय?
नवीन चार्ट तयार करण्याच्या वेळेचा फायदा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. यामुळे शेवटच्या क्षणाची अनिश्चितता दूर होईल आणि प्रवासाच्या नियोजनात सुसूत्रता येईल. त्याचबरोबर, भाडेवाढ ही किरकोळ असली तरी दूरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर थोडा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी काय करावे?
- आपल्या IRCTC खात्याला लवकरात लवकर आधारशी लिंक करावे.
- प्रवासाची योजना लवकर ठरवावी.
- प्रतीक्षा यादीवर असाल तर नवीन चार्ट वेळेमुळे मिळणारा वेळ उपयोगात घ्यावा.
- नव्या भाड्याचा अंदाज घेऊन बजेट तयार करावे.


















