Jammu Kashmir Terror Attack :  जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) पुंछ जिल्ह्यात दहशतवादी हल्ला (Terror Attack) झाला. दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ट्रकवर गुरुवारी (21 डिसेंबर) गोळीबार केला. या हल्ल्यात तीन जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दरम्यान, या भागात भारतीय लष्करावर महिनाभरात दुसरा दहशतवादी हल्ला आहे. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट भागातील 'डेरा की गली' मध्ये लष्कराने शोधमोहीम सुरू केली होती. या भागात चकमक सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


 






 


जम्मू येथील संरक्षण दलाचे प्रवक्ते लेफ्टिनेंट कर्नल सुशील बर्तवाल यांनी सांगितले की, आज संध्याकाळच्या सुमारास संपर्क साधण्यास यश मिळाले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास चकमक सुरू झाली. राष्ट्रीय रायफल्सच्या वाहनांवर सुरनकोट भागात थन्नामंडी आणि बाफलियाज भागात हल्ला झाला. 


चकमक सुरू झाल्यानंतर घटनास्थळी 48 आरआर आणि 43 आरआरच्या जवानांसह रुग्णवाहिका पाठवण्यात आली आहे. परिसरात रहदारी थांबवण्यात आली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमक घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. 


गेल्या महिन्यात राजौरीतील कालाकोटमध्ये लष्कराचे विशेष दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यादरम्यान लष्कराचे दोन जवान शहीद झाले. या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात राजौरी-पुंछ भागात झालेल्या दुहेरी हल्ल्यात १० जवान शहीद झाले होते. 2003 ते 2021 या काळात या भागात दहशतवादी आणि लष्कर यांच्यात अनेक चकमकी झाल्या. गेल्या दोन वर्षांत या भागात दहशतवादविरोधी कारवायांमध्ये लष्कराचे 35 हून अधिक जवान शहीद झाले आहेत.