Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आज (बुधवारी) भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख उत्तर दिलं आहे. या ऑपरेशन सिंदूर बाबतची माहिती भारत सरकारने पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हवाई दलातील व्योमिका सिंग त्यांच्यासोबत लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी या हल्ल्याची संपूर्ण माहिती दिली आणि सांगितले की भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने पाकिस्तानातील 9 ठिकाणांवरती एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांना उद्ध्वस्त केले. या संपूर्ण मोहिमेची माहिती "नारी शक्ती" देत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर, लष्कराकडून पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती देण्यात आली. यामध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हवाई दलातील व्योमिका सिंग त्यांच्यासोबत लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी या मोहिमेबाबत माहिती दिली आहे.
पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
1) परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ला हा 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा हल्ला होता, ज्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येने नागरिक मारले गेले होते. त्यांनी सांगितले की, हा हल्ला पाकिस्तानातून चालणाऱ्या लष्कर-ए-तैयबाने केला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली आहे. हल्लेखोरांचीही ओळख पटली आहे.
2) भारत सरकारने म्हटले आहे की पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निवेदनातून या संघटनेचा उल्लेख काढून टाकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. यावरून हे सिद्ध होते की, पाकिस्तानचे या संघटनेशी संबंध होते आणि हा हल्ला त्यांच्या प्रेरणेने झाला होता.
3) विक्रम मिस्री म्हणाले की, पाकिस्तानला दहशतवादाचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून जगभरात मान्यता मिळाली आहे. 23 एप्रिल रोजीच भारत सरकारने सिंधू पाणी करार थांबवण्यासारखी अनेक कठोर पावले उचलली होती. यानंतरही पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई केली नाही आणि उलट भारतावर आरोप केले.
4) अशा परिस्थितीत भारताने प्रत्युत्तर देणे योग्य मानले. अशा परिस्थितीत, भारताने सीमापार दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी कारवाई केली आहे. आम्ही मोजमापाने कारवाई केली आहे. आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच हल्ला केला आहे. आम्ही यापूर्वीही पाकिस्तानला कळवले होते की लष्कर आणि जैशचे दहशतवादी अड्डे त्यांच्या भूमीतून कार्यरत आहेत. यानंतरही पाकिस्तानने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. अशा परिस्थितीत, आपल्याविरुद्ध रचल्या जाणाऱ्या दहशतवादी कारस्थानांना रोखणे हा आपला अधिकार होता.
5) भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते. या कारवाईत 9 दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष्य करून नष्ट करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली. मार्च 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील चार जवानांची हत्या करण्यात आली होती.
6) पुढे सोफिया कुरेशी म्हणाल्या की, मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या आणि प्रशिक्षणाच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. मरकज सुभानल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असे. कोणत्याही लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही आणि नागरिकांची जीवितहानी झाली नाही, अशी माहिती लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी टार्गेट असलेली आणि ती ठिकाणे उद्ध्वस्त झाल्याचे फोटो देखील दाखवले.
7) भारताने केलेल्या संपूर्ण कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली. सोफिया कुरेशी माहिती देताना म्हणाल्या, आम्ही पीओके आणि पाकिस्तानमधील एकूण 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आहे.
8) या हल्ल्यांदरम्यान, आम्ही खात्री केली की फक्त दहशतवादी मारले जातील आणि कोणत्याही नागरिकाचे नुकसान होणार नाही. आम्ही कोटली अब्बासमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलं. या छावणीत सुमारे 1500 दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. याशिवाय, पाकिस्तानी पंजाबमधील बहावलपूर आणि महमूना झोया येथेही दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
9) एवढेच नाही तर मुरीदके येथील मरकज तैयबा देखील उद्ध्वस्त करण्यात आला आहे. हे लष्कराचे मुख्यालय असल्याचे म्हटले जाते आणि दहशतवादी अजमल कसाबलाही येथून प्रशिक्षण मिळाले होते. सोफिया कुरेशी म्हणाल्या की, आम्ही पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी तळाचे नुकसान केलेले नाही. याशिवाय नागरिकांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. आम्ही लक्ष्यित हल्ला केला आणि हा हल्ला थेट दहशतवादी लपण्याच्या ठिकाणांवर होता.
10) भारतीय सैन्याने आज बुधवारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत ही कारवाई केली. हे लक्ष्य विश्वसनीय माहितीच्या आधारे निवडले गेले होते आणि निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. जर पाकिस्तानने काहीही करण्याची हिंमत केली तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल असंही पुढे सोफिया कुरेशी यांनी म्हटलं आहे.