India neutralized Pakistan Radar system: भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर पाठोपाठ पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये अगदी आतपर्यंत मुसंडी मारत पाकची रडार यंत्रणा आणि एअर डिफेन्स यंत्रणा नष्ट केली आहे. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) नंतर चवताळलेल्या पाकिस्तानी सैन्याने बुधवारी रात्री भारताच्या पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा हल्ला भारताने उधळून लावला. त्यानंतर भारतीय सैन्याने (Indian Army) बुधवारी सकाळी पाकिस्तानमधील प्रमुख शहरांमध्ये ड्रोन हल्ले करुन पाकिस्तानची अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे उद्ध्वस्त केली. ही एअर डिफेन्स सिस्टीम चीनने (China) पाकिस्तानला दिली होती. या रडार यंत्रणेमुळे पाकिस्तान भारताच्या लढाऊ विमानांचा माग काढून त्यांची रडार यंत्रणा बंद पाडू शकत होता. तसेच  या यंत्रणेचा वापर करुन हवेतील विमानांना क्षेपणास्त्रांनी लक्ष्य करता येते. त्यामुळे भारतीय विमानांना पाकिस्तानमध्ये शिरण्यात खूप मोठा धोका होता. मात्र, आता भारताने पाकिस्तानची रडार यंत्रणाच उद्ध्वस्त केली आहे. (HQ-9 Radar system)

भारतीय लढाऊ विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरुन हल्ला करतील तेव्हा पाकिस्तानची HQ-9 रडार यंत्रणा त्यांना वाचवणार होती. मात्र, भारताने ही रडार यंत्रणा आणि पर्यायाने पाकिस्तानची संपूर्ण एअर डिफेन्स सिस्टीमच उद्ध्वस्त केल्याने भारतीय लढाऊ विमानांना आता फारसा अटकाव होणार नाही. आता भारतीय विमानं लाहोरपर्यंत पोहोचली तरी रडारवर त्यांचा माग काढणे शक्य होणार नाही. त्यामुळे सुखोई आणि राफेलसारख्या वेगवान विमानांना आता कमी धोका असेल. त्यामुळे आता पाकिस्तानने हल्ला केल्यास भारतीय हवाईदलाची विमाने लाहोरपर्यंत जाऊन कधीही बॉम्बफेक करु शकतील. हे भारताच्यादृष्टीने मोठे यश मानले जात आहे.

HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त झाल्याने काय होणार?

HQ-9 ही चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशननं (CPMIEC) विकसित केलेली एक पृष्ठभागावरून हवेत मारा (Surface-to-Air Missile – SAM) करणारी क्षेपणास्त्र (SAM) प्रणाली आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानली जाते आणि 2021 मध्ये पाकिस्ताननं आपल्या ताफ्यात तिचा समावेश केलेला. याची रेंज 125 ते 200 किलोमीटर असल्याचं सांगितलं जातंय. त्यात एकाच वेळी 100 लक्ष्यांचा मागोवा घेण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे.

भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान खूपच चिंतेत पडलं होतं. त्यामुळे त्यांनी तात्काळ  HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला. भारताची राफेल लढाऊ विमानं, सुखोई एसयू-30 एमकेआय आणि ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ही पाकिस्तानसाठी मोठी आव्हानं ठरणार आहेत. त्यामुळेच पाकिस्ताननं HQ-9 सारख्या क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. पण, आता भारतानं ड्रोनमार्फत पाकिस्तानची HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली उद्ध्वस्त केल्यामुळे आता पाकिस्तानची चिंता वाढली आहे. 

पाकिस्तानी लोक चीनच्या HQ-9 ची तुलना भारताच्या S-400 हवाई संरक्षण प्रणालीशी करतात. पाकिस्तानी काहीही म्हणोत, पण सत्य हे आहे की, पाकिस्तानला चीनकडून मिळालेली HQ-9 एअर डिफेन्स सिस्टिम तांत्रिकदृष्ट्या S-400 समोर अजिबात टिकू शकत नाही. HQ-9 ची रडार प्रणाली भारताच्या ब्राह्मोस सारख्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांना रोखू शकेल, याचा विचार करणंही अशक्य आहे. S-400 ची मारा करण्याची क्षमता 400 किलोमीटर आहे आणि ती खूप कमी वेळात कार्यान्वित होऊ शकते. त्या तुलनेत, HQ-9 तैनात करण्यासाठी फक्त अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो.

आणखी वाचा

मोठी बातमी: भारताची लाहोरपर्यंत मुसंडी, पाकिस्तानची रडार यंत्रणा केली उद्ध्वस्त, ड्रोन हल्ल्यांनी पाकला हादरवून सोडलं!