नवी दिल्ली : इंडिगोचं विमान 6E 2142 बुधवारी दिल्लीहून श्रीनगरला निघालं होतं. इंडिगोच्या या विमानाला खराब हवामानाचा फटका बसला होता.गारपीट झाल्यानं विमानाचं नुकसान झालं होतं. इंडिगोच्या त्या विमानात 227 प्रवासी होते, प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी इंडिगोच्या विमानाला पाकिस्तानच्या एअरस्पेसमध्ये प्रवेश करुन देण्याची परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पाकिस्ताननं परवानगी न दिल्यानं विमानातील 227 प्रवाशांचा जीव संकटात सापडला होता. यानंतर भारतीय हवाई दलाच्या मदतीनं विमानाचं सुरक्षित लँडिंग करण्यात आलं. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडे टीव्हीनं दिलं आहे. 

भारतीय हवाई दलाच्या सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणानं जारी केलेल्या NOTAM A0220 /25 नुसार भारतात नोंदणीकृत असलेल्या प्रवासी वाहतूक आणि सैन्य विमानांना पाकिस्तानची एअरस्पेस बंद करण्यात आली आहे. हा निर्णय 23 मेच्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात आला आहे. यामुळं लाहोर एटीसीनं परवानगी दिली नव्हती. 

हवाई दलानं कशी मदत केली?

भारतीय नॉदर्न एरिया कंट्रोलनं इंडिगोच्या पायलटला सल्ला दिला, दिल्ली कंट्रोल सोबत संपर्क करण्यात आला. पायलटला लाहोरच्या कंट्रोलची फ्रीक्वेन्सी देण्यात आली, जर पाकिस्तानच्या हवाई सीमेत प्रवेश करण्याची परवानगी मिळाली तर त्याचा वापर व्हावा यासाठी ती देण्यात आली होती. मात्र, पाकिस्तानकडून परवानगी न मिळाल्यानं विमान पर्यायी मार्गानं श्रीनगरकडे वळवण्यात आलं. तिथून भारतीय हवाई दलानं नियंत्रण आपल्या हाती घेतलं. पायलटला रिअल टाइम कंट्रोल वेक्टर आणि ग्राऊंड स्पीड अपडेट देत सुरक्षित लँडिंग केलं. 

नेमकं काय घडलेलं?

इंडिगोच्या विमानानं दिल्ली विमानतळावरुन श्रीनगरला जाण्यासाठी उड्डाण केलं होतं. विमान अमृतसर जवळ असताना पायलटला खराब हवामान असल्याचं लक्षात आलं. त्यावेळी पाकिस्तानकडे काही वेळासाठी त्यांच्या हवाई क्षेत्रात जाण्याची परवानगी मागण्यात आली. मात्र, पाकिस्तानच्या एटीसीकडून परवानगी नाकारण्यात आली. 

या घटनेनंतर एअरपोर्ट अथॉरिटी ऑप इंडियाच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं की इंडिगोच्या फ्लाईटला  6E2142 ला गारपीटीचा सामना करावा लागला. ज्यानंतर पायटलनं आपत्कालीन स्थिती जाहीर  केली. भारताच्या एअरफोर्सच्या मदतीनं विमानाचं सेफ लँडिंग करण्यात आलं. सर्व प्रवासी आणि स्टाफ सुरक्षित आहे. डीजीसीएनं या घटनेची चौकशी सुरु केली आहे.