India vs Pakistan War: पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानच्या मदतीसाठी चीन, तुर्की आणि अझरबैजानसारखे देश पुढे आले. त्यानंतर आता पाकिस्तानसाठी आणखी एक देश पुढे आला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान इजिप्तने (Egypt) भारताविरुद्ध पाकिस्तानला पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अलीकडेच इजिप्तच्या राष्ट्रपतींना फोन करून त्यांच्या मदतीबद्दल आभार मानले आहेत. सेंट्रल एजन्सी फॉर पब्लिक मोबिलायझेशन अँड स्टॅटिस्टिक्स (CAPMAS) नुसार, भारत हा इजिप्तचा सहावा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे, तर इजिप्त हा भारताचा 38 वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.
इजिप्त ही भारतासाठी एक मोठी बाजारपेठ-
2022-23 या आर्थिक वर्षात भारत आणि इजिप्तमधील व्यापार $6,061 दशलक्ष होता. 2021 मध्ये द्विपक्षीय व्यापार 7.26 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. 55 भारतीय कंपन्यांनी इजिप्तमध्ये सुमारे 4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. 2024 मध्ये भारत आणि इजिप्तमध्ये सुमारे 36 हजार कोटी रुपयांचा व्यापार झाला. दहा वर्षांत, दोन्ही देशांमधील आयात आणि निर्यात जवळजवळ पाच पट वाढली आहे.भारताने इजिप्तमध्ये सुमारे US$3.15 अब्ज किमतीच्या 50 हून अधिक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. तर इजिप्तने भारतात 37 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. इजिप्त ही भारतासाठी एक मोठी बाजारपेठ आहे.
इजिप्तने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने विविध चर्चांना उधाण-
1978 पासून दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार करार लागू आहे. 2023 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त त्या देशाचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित करण्यात आले होते. राजनैतिक सहकार्याव्यतिरिक्त, दोन्ही देशांमध्ये मोठे व्यापारी सहकार्य आहे. जरी, इजिप्तची परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात पाकिस्तानसारखीच असली तरी, त्याचे भारताशी चांगले संबंध राहिले आहेत. इजिप्त पाकिस्तानच्या धोरणांना आणि दहशतवादाला सतत विरोध करत आहे, परंतु भारताविरुद्ध त्यांनी ज्या पद्धतीने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे, त्यानंतर त्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पहलगाम हल्ल्याला आज एक महिना पूर्ण-
संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या पहलगाम हल्ल्याला आज एक महिना पूर्ण झाला आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात फिरणाऱ्या पर्यटकांवर 22 एप्रिल 2025 या दिवशी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळ्या चालवल्या आणि नंतर जंगलात पलायन केलं. अवघ्या 15 मिनिटांत हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. यात हल्ल्यात 25 पर्यटक आणि एक स्थानिक काश्मिरी यांचा मृत्यू झाला. डोंबिवलीतले तिघे, पुण्यातले दोघे तर पनवेलचे एक पर्यटक यांचाही मृतांत समावेश आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी एनआयए, स्थानिक पोलीस, सैन्यदल एकत्र काम करत आहे. एनआयएचे प्रमुख सदानंद दाते स्वतः या तपासावर लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर मारा करत ते बेचिराख केले. त्यानंतर पुढील चार दिवस पाकिस्तानलाही मोठा दणका दिला. मात्र मारेकरी दहशतवादी कुठे गेले, त्यांना कधी कंठस्नान घालणार असा सवालही विचारला जात आहे.
