Bhargavastra Anti Drone System :   भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा (India Pakistan ceasefire) निर्णय घेतला आहे. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या तणावादरम्यान भारताने पाकिस्तानकडून होणारे सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडले. भारत आपली सुरक्षा कायम मजबूत करत असल्याचं पाहायला मिळतं. आता भारताला ‘भार्गवास्त्र’ (Bhargavastra) ही एक नवीन स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली मिळाली आहे. भारताने आज (14 मे 2025) ओडिशातील (Odisha) गोपाळपूर येथे स्वदेशी अँटी-ड्रोन सिस्टम 'भार्गवस्त्र'ची यशस्वी चाचणी घेतली. ‘भार्गवास्त्र’ ही ड्रोन प्रणाली एकाच वेळी अनेक ड्रोनवर मारा करण्यास सक्षम असल्याचं सांगितंल जात आहे. 

भार्गवास्त्र मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले रोखण्यास सक्षम 

13 मे 2025 रोजी ओडिशातील गोपाळपूर येथे आर्मी एअर डिफेन्स (AAD) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रॉकेटच्या तीन चाचण्या घेण्यात आल्या. प्रत्येकी एक रॉकेट डागून दोन चाचण्या घेण्यात आल्या. एक चाचणी दोन सेकंदात साल्वो मोडमध्ये दोन रॉकेट डागून घेण्यात आली. अहवालानुसार, सर्व रॉकेटनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आणि आवश्यक प्रक्षेपण मापदंड साध्य केले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले रोखता येतील.

भार्गवास्त्राचा पल्ला 2.5 किमीपर्यंत 

'भार्गवास्त्र' हे मानवरहित हवाई वाहन (UAV) धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. यात द्वि-स्तरीय मारक यंत्रणा आहे. याच्या पहिल्या थरात दिशाहीन मायक्रो रॉकेट्स तैनात केले आहेत, जे 20 मीटरच्या अंतरातील ड्रोनच्या ताफ्याला उद्ध्वस्त करण्यात सक्षम आहे. याचा मारक पल्ला 2.5 किमीपर्यंत आहे. तर, दुसऱ्या थरामध्ये अचूक लक्ष्य साधणारं मार्गदर्शित सूक्ष्म क्षेपणास्त्र आहे. हे भार्गवास्त्र 6 ते 10 किमी अंतरावरुन शत्रुला ओळखेल.  

 

5000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशात देखील कार्य करण्यास सक्षम 

एसडीएएलने विकसित केलेली ही प्रणाली मॉड्यूलर आणि भूप्रदेशाशी जुळवून घेणारी असून, 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशात देखील कार्य करण्यास सक्षम आहे. यामुळे ती भारतीय सशस्त्र दलांच्या मोहिमांमध्ये मोठी भूमिका बजावू शकते. 'भार्गवास्त्र'चे रडार 6 ते 10 किमी अंतरावरील लो रडार क्रॉस-सेक्शनमध्ये (LRCS) हवाई लक्ष्य शोधू शकते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने ज्या पद्धतीने तुर्की आणि चिनी ड्रोनचा वापर केला त्यावरून हे स्पष्ट झाले आहे की भविष्यात भारताला नवीन ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर रोखावा लागणार आहे.

भार्गवास्त्राच्या नावाचा इतिहास खास

महाभारतात काही विध्वंसक अस्त्र वापरले गेले होते. यापैकी एक भार्गवास्त्र देखील होते. ज्याचे नाव महर्षी भार्गव परशुराम यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. त्यामुळं 'भार्गवास्त्र'च्या नावाचा इतिहास खास आहे. आता या नावापासून प्रेरणा घेऊन, भारताने एक अत्याधुनिक सूक्ष्म-क्षेपणास्त्र आधारित काउंटर-ड्रोन प्रणाली विकसित केली आहे. भारताच्या ताफ्यात सामील झालेले हे नवीन 'भार्गवास्त्र' आधुनिक युद्धात देशाच्या सुरक्षेला एका नवीन उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहे.

महत्वाच्या बातम्या:

ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्रोची एन्ट्री, पाकिस्तानच्या अवकाशावर 10 उपग्रहांची नजर, प्रत्येक हालचाल टिपणार!