मुंबई : एकीकडे भारत दहशतवादाविरोधात लढत असताना त्या विरोधात भूमिका घेत पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीला आता मोठा दणका बसला आहे. भारतातील प्रमुख विमानतळांवर हँडलिंग सेवा देणाऱ्या तुर्कीच्या कंपनीचे कामाचे लायसन्स भारताने रद्द केलं आहे. Celebi NAS Airport Services India Ltd या तुर्की कंपनीचे सिक्युरिटी क्लिअरन्स मागे घेण्यात आलं आहे. त्यामुळे या कंपनीला आता भारतात काम करता येणार नाही.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील विविध भागांमधून Celebi NAS Airport Services India Ltd या तुर्की कंपनीच्या भूमिगत हँडलिंग सेवांवर बंदी घालण्याची मागणी होत होती. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही मागणी गंभीर असून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने संबंधित कंपनीचा सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे.
India Vs Turkey : मुंबई, बंगळुरुसह अनेक विमानतळांवर सेवा देणारी कंपनी
Celebi NAS Airport Services India Ltd ही तुर्कीतील Celebi Aviation Holdings या कंपनीची भारतीय शाखा आहे. 2007 मध्ये भारतात प्रवेश केल्यानंतर, या कंपनीने दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, कोचीन, अहमदाबाद, गोवा, कन्नूर आणि चेन्नई या विमानतळांवर भूमिगत हँडलिंग आणि कार्गो ऑपरेशन्स सुरू केले आहेत. कंपनीने 2023 मध्ये चेन्नई विमानतळावरही भूमिगत हँडलिंग सेवा सुरू केली होती.
सिक्युरिटी क्लिअरन्स रद्द केल्यानंतर संबंधित कंपनीला भारतातील विमानतळांवर भूमिगत हँडलिंग सेवा पुरविण्याचा अधिकार नसणार आहे. यामुळे या कंपनीच्या भारतीय ऑपरेशन्सवर परिणाम होईल. राष्ट्रीय सुरक्षेची आणि देशाच्या हिताची रक्षा करणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. या निर्णयामुळे भारतीय हवाई क्षेत्राच्या सुरक्षेत वाढ होईल असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
India Order Against Turkey Company : काय म्हटलंय सरकारच्या आदेशात?
भारतीय विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा देणारी तुर्की कंपनी सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडवर बंदी घालण्यासाठी संपूर्ण भारतातून आमच्याकडे मागण्या करण्यात आल्या. या समस्येचे गांभीर्य आणि राष्ट्रीय हितांचे संरक्षण लक्षात घेता भारत सरकारने सदर कंपनीला देण्यात आलेल्या सिक्युरिटी क्लिअरन्स मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राची सुरक्षा आणि हित सुनिश्चित करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
