भारताचं गव्हाचं जहाज इराणमार्गे अफगाणिस्ताकडे रवाना
एबीपी माझा वेब टीम | 30 Oct 2017 01:27 PM (IST)
इराणमधील ज्या चाबहार बंदराच्या विकासासाठी भारताने कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे, त्याच बंदरामुळे आता इराणसह अफगाणिस्तान हे तिन्ही देश एकमेकांच्या अगदी जवळ आले आहेत.
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारताचं गव्हाचं जहाज इराणधील चाबहार बंदरामार्गे अफगाणिस्तानकडे रवाना झालं आहे. व्यापारासाठी भारताने पहिल्यांदाच इराणमधील चाबहार बंदराचा वापर केला आहे. भारत, इराण आणि अफगाणिस्तान या तिन्ही देशांतील व्यापारी संबंध आणखी दृढ होण्यासाठी या समुद्रमार्गे गहू निर्यातीचा मोठा वाटा ठरणार आहे. इराणमधील ज्या चाबहार बंदराच्या विकासासाठी भारताने कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे, त्याच बंदरामुळे आता इराणसह अफगाणिस्तान हे तिन्ही देश एकमेकांच्या अगदी जवळ आले आहेत. https://twitter.com/MEAIndia/status/924564479928549376 भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री सलाहुद्दीन रब्बानी आणि इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद झरीफ यांनी रविवारी (29 ऑक्टोबर) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकमेकांशी संवाद साधला आणि भारत-अफगाणिस्तान व्हाया चाबहार बंदर या मार्गाला हिरवा कंदिल दाखवला. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या करारानुसार भारत 11 लाख टन गहू अफगाणिस्तानला पुरवणार आहे. तो गहू घेऊन भारताचं जहार चाबहार बंदरामार्गे रविवारी अखेर रवाना झालं. याआधी पाकिस्तानामार्गेच भारत-अफगाणिस्तानमधील व्यापार होत असे. मात्र आता चाबहार बंदरामार्गे व्यापार होणार असल्याने इराणशीही भारताला थेट संपर्कात राहणं शक्य होणार आहे.