मुंबई : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता वाढली असताना भारताचा जुना आणि विश्वासू मित्र रशियाने मोठी हमी दिली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव (Sergey Lavrov) यांनी भारताच्या ऊर्जा गरजांवर कोणताही परिणाम होऊ देणार नाही, असे स्पष्ट केलं. ऊर्जा पुरवठ्याच्या बाबतीत रशिया कधीही भारताशी केलेल्या वचनांपासून मागे हटलेला नाही. भारत आणि रशियाचे संबंध केवळ रणनीतिक नाहीत, तर ते दीर्घकालीन मैत्री आणि परस्पर विश्वासावर आधारित असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
Russia Energy Supply : भारताच्या हितांचे पूर्ण संरक्षण करू
लावरोव म्हणाले की, "रशियन ऊर्जा पुरवठ्यामुळे भारताच्या हितांना कोणताही धक्का बसणार नाही. अन्य देशांकडून होत असलेल्या अन्यायकारक स्पर्धेमुळे भारत-रशिया करारांवर परिणाम होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. भारताला आवश्यक असलेला तेल, गॅस आणि कोळशाचा पुरवठा अखंडपणे सुरू राहील. त्यामुळे जागतिक संकटाच्या काळातही भारताला ऊर्जा सुरक्षेबाबत दिलासा मिळणार आहे."
Kudankulam Project : कुडनकुलम प्रकल्प भारतासाठी महत्त्वाचा
तामिळनाडूतील कुडनकुलम अणुउर्जा प्रकल्प (Kudankulam Nuclear Power Plant) हा भारत-रशिया सहकार्याचा प्रमुख प्रकल्प असल्याचे लावरोव यांनी सांगितलं. या प्रकल्पातील नवीन युनिट्सच्या उभारणीवरही दोन्ही देशांमध्ये सहकार्य सुरू आहे. तामिळनाडूमधील हा अणुऊर्जा प्रकल्प भारताच्या ऊर्जा गरजांचा महत्त्वाचा भाग पूर्ण करतो. 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्याची अपेक्षा आहे.
India Russia Relations : भारत-रशिया मैत्री अतूट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत लावरोव म्हणाले की, मोदी हे जगातील सर्वाधिक ऊर्जावान नेत्यांपैकी एक आहेत. भारताची आर्थिक, संरक्षण, सांस्कृतिक आणि तांत्रिक स्वायत्तता मजबूत करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. भारत आणि रशियाचे संबंध इतके मजबूत आहेत की दोन्ही देशांचे मार्ग वेगळे होणे अकल्पनीय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Hindi Russian Bhai Bhai : सांस्कृतिक नातेसंबंधही घट्ट
‘हिंदी-रूसी भाई भाई’ हा केवळ नारा नसून दोन्ही देशांच्या सांस्कृतिक नात्याचे प्रतीक असल्याचे लावरोव यांनी सांगितले. राज कपूर (Raj Kapoor) यांचे चित्रपट आजही रशियात लोकप्रिय असल्याचं त्यांनी नमूद केलं. सांस्कृतिक देवाणघेवाण, ऊर्जा सहकार्य, संरक्षण क्षेत्रातील भागीदारी आणि उच्चस्तरीय राजनैतिक संवाद यामुळे भारत-रशिया संबंध अधिक मजबूत झाले आहेत.
BRICS Meeting : नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा
भारत दौऱ्यादरम्यान लावरोव हे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच BRICS देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतही ते सहभागी होणार आहेत. या चर्चेत पश्चिम आशियातील परिस्थिती, संयुक्त राष्ट्रे (United Nations), BRICS आणि G20 अंतर्गत सहकार्य, तसेच व्यापार, ऊर्जा, विज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीवर चर्चा होणार आहे. ही बातमी वाचा:
