Coronavirus Cases Today in India : अलिकडच्या काही दिवसांमध्ये देशातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसामध्ये वाढत असलेला कोरोनाचा आलेख किंचित घटला आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली आहे. रविवारी दिवसभरात देशात 16 हजार 464 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
देशात रविवारी 39 कोरोनाबाधितांचा मृत्यू
देशात सध्या एक लाख 43 हजार 989 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात गेल्या 24 तासांत 39 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण 5 लाख 26 हजार 396 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत. रविवारी 16 हजार 112 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून 4 कोटी 33 लाख 65 हजार 890 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
महाराष्ट्रात रविवारी 1849 कोरोना रूग्णांची नोंद
महाराष्ट्रात रविवारी 1849 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1853 रुग्ण बरे होऊन रविवारी घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनातून बऱ्या होणाऱ्यांची संख्या 78 लाख 86 हजार 348 वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98 टक्के झाले आहे. दरम्यान, शनिवारच्या तुलनेत रविवारी राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत थोडीशी घट झाली आहे.
रविवारी मुंबईत 322 नव्या रुग्णांची भर
मुंबईत रविवारी 322 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी 236 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,03,261 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 651 झाली आहे. सध्या मुंबईत 1,901 रुग्ण आहेत.