Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. मागील सलग चार दिवस कोरोना रुग्णांची संख्या घटली होती. यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. मागील चार दिवस कोरोना रुग्णांचा आलेख घटल्याचं पाहायला मिळाला. गेल्या 24 तासांत 17 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच बुधवारी दिवसभरात 19 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या घटली
भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 34 लाख 3 हजार 610 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या भारतात 1 लाख 37 हजार 57 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.31 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.49 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 19 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत मंगळवारी 329 रुग्णांची नोंद, 263 कोरोनामुक्त
मुंबईत मंगळवारी 329 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 263 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,03,700 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 651 झाली आहे. सध्या मुंबईत 1,955 रुग्ण आहेत.
महाराष्ट्रात 1886 रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात मागील 24 तासांत 1886 कोरोनाच्या नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर मंगळवारी दिवसभरात एकूण 2106 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई जिल्ह्यातील आहे. राज्यात मंगळवारी पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,89,478 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98 टक्के इतकं झालं आहे.