India Rain News : यंदाचा जुलै महिन्यात देशाच्या बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची (Rain) नोंद होण्याची शक्यता आहे. मात्र ईशान्य व पूर्व भारतातील बहुतांश भाग, तसेच दक्षिणेकडील काही टोकाचे परिसर आणि वायव्य भारतातील काही भागांत पर्जन्यवृष्टी सरासरीपेक्षा कमी राहण्याचा इशारा देखील हवामान विभागानं (IMD) दिला आहे. जुलै महिन्यात पावसाची नेमकी स्थिती कशी राहील याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.
ईशान्य, पूर्व भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस
भारतीय हवामान विभागाने (IMD) जुलै महिन्यासाठी दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. देशवासीयांना या महिन्यात उष्णतेपासून आराम मिळण्याची शक्यता असून, बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि सामान्यपेक्षा कमी तापमान राहण्याचा अंदाज आहे. मात्र, हा पाऊस सर्वत्र सारखा नसेल, कारण ईशान्य आणि पूर्व भारतासह काही भागांना कमी पावसावरच समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत.
जुलैमध्ये 106 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जुलै 2025 मध्ये देशभरातील एकूण मासिक पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) 106 टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. सामान्यतः जुलै महिन्यात देशभरात सुमारे 280 मिमी पावसाची नोंद होते. हा अतिरिक्त पाऊस शेती आणि देशातील जलस्रोतांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. दरम्यान, मागील जून महिन्यात राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळं नदी नाले धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
अतिरिक्त पावसासोबत धोक्याचाही इशारा
भारत हवामान खात्याचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2025 मध्ये पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या 106 टक्क्यांहून अधिक असण्याची शक्यता आहे. अधिक पाऊस शेती व जलस्रोतांसाठी फायदेशीर ठरेल, मात्र यामुळे पूर, भूस्खलन, वाहतुकीत अडथळे आणि आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात.
या भागांमध्ये कमी पावसाची शक्यता
ईशान्य भारत, पूर्व भारत, दक्षिण द्वीपकल्पाचा काही भाग आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमानाच्या बाबतीत, किमान तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र, कमी पावसाच्या भागांत तापमान जास्त राहू शकते.
जून महिन्यातील पावसाची स्थिती
जून 2025 मध्ये देशात सरासरीपेक्षा 9 टक्के जास्त पावसाची नोंद झाली. - पूर्व भारत: -16.9 टक्के- दक्षिण भारत: -2.7 टक्के - वायव्य भारत: +42.2 टक्के - मध्य भारत: +24.8 टक्के
महत्वाच्या बातम्या: