Dawood Ibrahim India Pakistan War: भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर आणि वेगवान ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. याला पाकिस्तानात लपून बसलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) हादेखील अपवाद नाही. भारतीय सैन्याने (Indian Army) गुरुवारी रात्री लाहोर, कराची आणि इस्लामाबादपर्यंत आत शिरुन ड्रोन हल्ले केले होते. त्यामुळे पाकिस्तानने दाऊद इब्राहिम, छोटा शकील (Chhota shakeel) आणि मुन्ना झिंगडा या तिघांना सेफ हाऊसमध्ये हलवले आहे. काहीजणांच्या मते हे तिघेजण भारताच्या भीतीने पाकिस्तान सोडून दुसऱ्या देशात पळून गेल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद हा पाकिस्तानमध्ये असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानने त्याला कराचीत संरक्षण देऊन सुरक्षित ठेवल्याचेही सांगितले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये अगदी आतवर मुसंडी मारत ड्रोन हल्ले केले आहेत. भारतीय सैन्याने लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीमही उद्ध्वस्त केली होती. त्यामुळे युद्धाचा भडका उडाल्यास भारतीय सैन्य कराची आणि इस्लामाबादपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दाऊद इब्राहिम प्रचंड घाबरला असून तो सुरक्षित जागा शोधत फिरत असल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दाऊदविषयी समोर येणाऱ्या वृत्तांवर भारतीय सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. कदाचित दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानच्या दुसऱ्या भागात लपून बसला असेल. मात्र, भारताची दिशाभूल करण्यासाठी जाणीवपूर्वक तो देशातून पळून गेल्याची अफवा पसरवल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा त्यांच्यापर्यंत येणारी माहिती पडताळून बघत आहेत. त्यानंतरच केंद्र सरकारकडून यासंदर्भात भाष्य केले जाईल. यासंदर्भात पुढील काही तासांत काही माहिती समोर येते का, हे बघणे महत्त्वाचे ठरेल.
पोलीस दलाकडून सोशल मीडियावरील मजकुरावर लक्ष
भारताने पहलगाम हल्ल्यानंतर राबवलेल्या ऑपरेशन 'सिंदूर'बाबत आक्षेपार्ह पोस्ट आणि अकाऊंट महाराष्ट्र पोलिसांकडून डिलिट करण्यात आल्या आहेत. ऑपरेशन 'सिंदूर'बाबत चुकीच्या आणि अफवा पसरवणाऱ्या पोस्टवर महाराष्ट्र पोलिसांची नजर आहे. गेल्या दोन दिवसांत ऑपरेशन 'सिंदूर' 250 हून अधिक पोस्ट आणि लिंक महाराष्ट्र पोलिसांकडून डिलिट करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
आणखी वाचा
