मुंबई : पहलगाममध्ये जिहादी अतिरेक्यांनी निष्पाप पर्यटकांना धर्म विचारुन मारलं. ज्यांचं कुंकू पुसलं गेलं त्या माताभगिनींचा आक्रोश सगळ्या जगाने ऐकला. त्या आक्रोशाचं उत्तर भारताने ऑपरेशन सिंदूरनं दिलं. 15 दिवसांत पाकिस्तानमधले अतिरेकी अड्डे भारतीय सेनेनं हवाई हल्ला करुन उद्धवस्त केले. या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्याची जबाबदारी भारतीय सेनेनं दोन जिगरबाज, तडफदार महिला अधिकाऱ्यांवर टाकली. कर्नल सोफिया कुरेशी (Col Sofiya Qureshi) आणि विंग कमांडर व्योमिका सिंह (Wing Commander Vyomika Singh) त्यांचं नाव.
भारताच्या सैन्यदलांनं पाकव्याप्त काश्मीरमधील 5 आणि पाकिस्तानच्या हद्दीतील 4 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. पहलगाम हल्ला करणाऱ्य़ांवर 9 ठिकाणी प्रहार केला. त्याला नाव दिलं ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय, भारतीय सेना आणि हवाई दलाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
मागे काळ्या पडद्यावर भारताची राजमुद्रा आणि त्या खाली ऑपरेशन सिंदूर हे शब्द... सगळा देश उत्सुकतेनं वाट बघत असतानाच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांची एन्ट्री झाली. त्यांच्या पाठोपाठ दोन महिला अधिकारी खुर्चीवर विराजमान झाल्या. एक होत्या भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसऱ्या होत्या भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर व्योमिका सिंह.
विक्रम मिस्त्री यांनी थोडक्यात पार्श्वभूमी सांगितली आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने केलेल्या काटेकोर हल्ल्याचे पुरावे जगासमोर मांडण्याची जबाबदारी सोपवली कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याकडे. त्यानंतर या दोन तडफदार महिला अधिकाऱ्यांनी माईकचा ताबा घेतला.
Who Is Sophia Qureshi : कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी?
- गुजरातमधील बडोद्याच्या रहिवासी- बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी- 1999 मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत लष्करात दाखल. - बहुराष्ट्रीय 'एक्सरसाईज फोर्स 18' प्रोग्रॅमचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी.- 2006 मध्ये कांगोत संयुक्त राष्ट्रांच्या शांती अभियानात सहभागी.- घरात लष्कराचा समर्थ वारसा, आजोबांनी भारतीय सेनेत सेवा केली आहे.- पती मेजर ताजुद्दिन कुरेशी मेकनाईज्ड इन्फंट्रीचे अधिकारी आहेत.
Who Is Vyomika Singh : कोण आहेत विंग कमांडर व्योमिका सिंह?
- 18 डिसेंबर 2004 मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत हवाई दलात.- हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून हाय अल्टिट्युड मिशनचं नेतृत्व.- चेतक, चिताहसारख्या हेलिकॉप्टरनी 2,500 पेक्षा अधिक तासांच्या उड्डाणाचा विक्रम.- नोव्हेंबर 2020 मध्ये अरुणाचल प्रदेशात बचाव मोहिमेचं नेतृत्व.
भारतीय सैन्यांत अनेक दिग्गज अधिकारी असताना यो दोन तरुण महिला अधिकाऱ्यांची एअर स्ट्राईकबद्दल माहिती देण्यासाठी निवड का केली याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. पहलगाममध्ये जिहादी दहशतवाद्यांनी धर्म विचारून 26 पुरुषांना मारलं. त्या हल्ल्याचा बदला भारतानं घेतला आणि धर्माच्या नावावर भारतात फूट पाडू पाहणाऱ्या दहशतवादी आणि पाकिस्तानलाही उत्तर दिलं.
दहशतवाद्यांनी पुरुषांवर गोळी चालवताना महिलांना सांगितलं होतं, मोदी को जाके बोल देना... त्याच दहशतवाद्यांच्या आकांचं कंबरडं मोडल्यानंतर ते जगाला सप्रमाण सांगण्यासाठी पुढे सरसावल्या भारतीय सैन्य दलातल्या दोन जिगरबाज महिला.
एक हिंदू महिला अधिकारी आणि एक मुस्लिम महिला अधिकाऱ्यांना बोलण्याची जबाबदारी देऊन भारतानं पाकिस्तान विचार करतो त्याची कितीतरी पुढे आपण असल्याचं दाखवून दिलं. भारताविरोधात धर्माचं तुणतुणं वाजवणाऱ्या पाकिस्तानला हीसुद्धा एक मोठी चपराक आहे.