Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अंतर्गत तणाव वाढला आहे. पाकिस्तानची आर्थिक कोंडी, सिंधु नदीचे पाणी रोखणे, पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याची नोटीस अशा कारावाया भारताने सुरु केल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तानविरोधात डिजिटल स्ट्राईक पुकारल्यानंतर आता केंद्र सरकारने पाकिस्तानेच पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांचे अधिकृत यूट्यूब चॅनल भारतात ब्लॉक केले आहे. भारत सरकारने 16 प्रमुख पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर बंदी घातल्यानंतर आता  आणखी एक कठोर पाऊल उचचले आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे इंस्टाग्रॅम अकाऊंट ब्लॉक

भारतीय सैन्य आणि सुरक्षा एजन्सीजविरोधात प्रक्षोभक आणि सांप्रदायिक तेढ निर्माण करणारे, तसेच खोटे व दिशाभूल करणारे व्हिडिओ दाखवणाऱ्या पाकिस्तानच्या युट्यूब चॅनल्सला भारतात बंदी घालण्यात आली. यापूर्वी भारत सरकारने अनेक पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या सोशल मीडिया अकाऊंटवर डिजिटल स्ट्राईक केला होता. ज्यात अनेक क्रिकेटपटूंचा समावेश होता. शुक्रवारी (2 मे) भारताने बाबर आझम, मोहम्मद अमीर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद रिजवान, हॅरिस रौफ आणि इमाम उल हक यांचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर बंदी घातली आहे.

दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओमुळे अनेक युट्यूब चॅनेल ब्लॉक

भारताने बंदी घातलेल्या अनेक प्लॅटफॉर्ममध्ये डॉन, समा टीव्ही, एआयवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज, आणि सुनो न्यूज या प्रमुख पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांचे युट्यूब चॅनेल  समाविष्ट आहेत. याशिवाय पत्रकार इर्शाद भट्टी, आस्मा शिराजी, उमर चीमा आणि मुनीब फारूख यांच्या युट्युब चॅनल्सवरही बंदी घालण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोषींना कठोर शासन होणारच असे आश्वासन दिल्यानंतर दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना कल्पनेपलिकडे असलेली शिक्षा देण्याबद्दल वक्तव्य केल्याने दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे. पाकिस्तानकडून युद्धाबाबत चिथावणीखोर वक्तव्य करण्यात येत आहेत. 

पाकिस्तानने भारतीय गाण्यांचे प्रसारण थांबवले

गुरुवारी (1 April) पाकिस्तानच्या एफएम रेडिओ स्टेशन्सने भारतीय गाण्यांचे प्रसारण बंद केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय गाणी, विशेषत: लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि मुकेश यांसारख्या महान गायकांची गाणी पाकिस्तानी लोकांमध्ये लोकप्रीय आहेत. तेथील एफएम रेडिओ स्टेशनवर या गायकांची गाणी दररोज वाजवली जातात.

हेही वाचा:

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानच्या पंतप्रधानांना हवीय तुरुंगातील 'त्या' व्यक्तीची मदत; मनधरणीसाठी सुरुवात, पाकिस्तानमध्ये काय घडतंय?