India Coronavirus Updates : भारतात कोरोना संसर्गात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवरीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 18,166 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 214 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. अशातच 24 तासांत 23624 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. म्हणजेच, सक्रिय रुग्णसंख्येत 5672 नी कमी झाली आहे.
देशातील कोरोना स्थिती :
कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 39 लाख 53 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 50 हजार 589 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाबा म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 32 लाख 71 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास दोन लाख आहे. एकूण 2 लाख 30 हजार 971 रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
देशातील कोरोनाची आकडेवारी :
कोरोनाबाधितांची एकूण संख्या : तीन कोटी 39 लाख 53 हजार 475
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 32 लाख 71 हजार 915
एकूण सक्रिय रुग्णांची संख्या : दोन लाख 30 हजार 971
एकूण मृत्यू : चार लाख 50 हजार 589
एकूण लसीकरण : 94 कोटी 70 लाख 10 हजार डोज
राज्यात काल (शनिवारी) 2446 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2486 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल (शनिवारी) 2 हजार 446 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 486 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 99 हजार 464 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे.
दरम्यान, राज्यात काल (शनिवारी) 44 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. हिंगोली, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, या पाच जिल्ह्यांमध्ये आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या कोरोनाचे 33 हजार 6 सक्रीय रुग्ण आहेत.
पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 422 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (16), नंदूरबार (5), धुळे (8), जालना (60), परभणी (89), हिंगोली (19), नांदेड (08), अकोला (26), वाशिम (05), बुलढाणा (09), नागपूर (82), यवतमाळ (06), वर्धा (3), भंडारा (1), गोंदिया (3), गडचिरोली (14) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
मुंबईत काल (शनिवारी) 523 नवीन रुग्णांची नोंद
मुंबईत मागील 24 तासांत 523 नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 498 रुग्ण कोरोनातून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. परिणामी बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 72 लाख 36 हजार 606 इतकी झाली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा दर 97% झालाय. गेल्या 24 तासात 3 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या शहरात 5 हजार 38 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. दुप्पटीचा दर आता 1091 दिवसांवर गेला आहे.