India Corona Update : देशातील कोरोना प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तरी धोका अद्याप टळलेला नाही. सध्याच्या देशातील सक्रिय रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण केरळातील आहेत. आरोग्य मंत्रालयानं बुधवारी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 18,833 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 278 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 24 तासांत 24770 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, देशातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या अडिच लाखांहून कमी झाली आहे. देशात सध्या 2,46,687 रुग्ण सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ही 203 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. यापूर्वी मंगळवारी कोरोनाच्या 18 हजार 346 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 201 दिवसांनी मंगळवारी नव्या कोरोनाबाधितांची संख्या 20 हजारांनी कमी आली. जाणून घेऊया देशातील कोरोनाची सद्यस्थिती...
आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल (मंगळवारी) 4 हजार 770 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन 2 लाख 46 हजार 687 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनाच्या तीन कोटी 38 लाख 71 हजार 881 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 49 हजार 538 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 31 लाख 75 हजार 665 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात काल (मंगळवारी) 2, 696 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रुग्ण बरे होण्याचा दर 97.32 टक्के
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यात काल (मंगळवारी) 2, 401 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 840 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 88 हजार 899 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे.
राज्यात काल (मंगळवारी) 39 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 593 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (18), नंदूरबार (1), धुळे (3), जालना (44), परभणी (80), हिंगोली (15), नांदेड (08), अकोला (22), वाशिम (08), बुलढाणा (25), यवतमाळ (09), वर्धा (8), भंडारा (2), गोंदिया (1), गडचिरोली (16 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यात सध्या 33 हजार 159 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,40,052 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,338 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 94, 69, 053 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,64, 915 (11.04टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 433 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 433 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 525 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,096 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4438 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1154 दिवसांवर गेला आहे.