नवी दिल्ली : भारतानं चिनाब नदीवर बांधलेल्या रियासी येथील सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडले. या धरणातून आतापर्यंत पाकिस्तानकडे जाणारं पाणी रोखण्यात आलं होतं. सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा सलाल धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पूर येण्याची शक्यता वाढू शकते.
भारतानं सलाल आणि बगलिहार धरणातून पाणी सोडल्यानं पुराचं संकट निर्माण झालं आहे. जोरदार पावसामुळं भारतानं रामबन येथील बगलिहार धरणाचा दरवाजा उघडला आहे. भारतानं हे स्पष्ट केलंय की सिंधू जल करार स्थगित झालेला आहे. त्यामुळं आता या धरणांमधून किती पाणी सोडायचं हा निर्णय भारताच्या हातात आहे. भारतानं यापूर्वी चिनाब नदीतील पाणी रोखलं होतं. आता दरवाजा उघडल्यानं पाणी पाकिस्तानात पोहोचेल.
भारतानं सलाल आणि बगलिहार धरणातून पाणी का सोडण्यात आलं याचं कारण सांगण्यात आलेलं नाही. भारतानं अचानक पाणी सोडल्यानं पाकिस्तानातील लोकांच्या अडचणी वाढू शकतात. यामुळं पाकिस्तानी नागरिक त्यांच्या सरकारला प्रश्न विचारु शकतात.
विदेश मंत्रालय आणि संरक्षण दलाकडून आज देखील पत्रकार परिषद घेण्यात आली. विदेश मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी कालपासून आजपर्यंत काय घडलं याबाबत माहिती दिली.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी 7 मे 2025 ला झालेल्या पत्रकार परिषेदत भारतानं आपली प्रतिक्रिया केंद्रीत, संतुलित आणि वादाला उत्तेजन देणारी नव्हती, असं सांगितलं होतं. भारतानं पाकिस्तानच्या लष्करी ठाण्यावर हल्ला केला नाही हे सांगण्यात आलं होतं. भारतीय सैन्यावर हल्ला केल्यास प्रत्युत्तर दिलं जाईल असं सांगितलं होतं, अशी आठवण सोफिया कुरेशी यांनी करुन दिली.
7 मे च्या रात्री पाकिस्ताननं भारताच्या उत्तर पश्चिमेतील पाकिस्ताननं अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या ठिकाणांवर लष्करी हल्ल्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांना इंटिग्रेडेड काऊंटर यूएएस ग्रिड आणि वायूरक्षक प्रणालीद्वारे निष्क्रिय करण्यात आले. याचे अवशेष सापडले ज्यानं यात पाकिस्तानचा हात असल्याचं समोर आलं आहे, असं सोफिया कुरेशी म्हणाल्या.
आज सकाळी भारतानं पाकिस्तानच्या एअर डिफेन्स रडार आणि प्रणालीला लक्ष्य केलं. भारताची प्रतिक्रिया समान क्षेत्रात समान तीव्रतेनं देण्यात आली. विश्वसनीयरित्या माहिती मिळाली की लाहोर मधील एअर डिफेन्सला निष्क्रिय करण्यात आलं, अशी माहिती सोफिया कुरेशी यांनी दिली.
