मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्‍वभूमीवर इंडिया आघाडीची (I.N.D.I.A) शनिवार 13 जानेवारी रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. सकाळी 11.30 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आसून ही बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार (Nitish Kumar) यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते.  त्याचप्रमाणे काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते. 


इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असेलेले बहुतेक पक्ष हे नितीश कुमार यांना समन्वयक बनविण्यावर सहमत आहेत. परंतु  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, एम.के स्टॅलिन उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आलीये. 


इंडिया आघाडीच्या बैठीकांचं सत्र सुरु


आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान शनिवारी होणारी इंडिया आघाडीची ही बैठक जागावाटपाच्या निर्णयांसंदर्भात महत्त्वाची असल्याचं म्हटलं जात आहे. कारण लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत, त्यातच इंडिया आघाडीला जागावाटपाबाबत ठोस भूमिका घ्यायची आहे. आतापर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार, अरविंद केजरीवाल,  RJD आणि समाजवादी पक्ष यांच्यासोबत जागावाटपाबाबत बैठका घेतल्या आहेत. मात्र, अद्यापही तृणमूल काँग्रेससोबत कोणतीही चर्चा झालेली नाही.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जानेवारी रोजी टीएमसीने काँग्रेसला लोकसभेच्या 42 जागांपैकी 2 जागांची ऑफर दिली आहे. तृणमूल काँग्रेसची ऑफर नाकारताना काँग्रेसने सांगितले की, ती फारच लहान जागा असल्याने ते यासाठी तयार नाहीत. तृणमूल बंगालमध्ये काँग्रेसला 3 जागा देण्यास तयार आहे, परंतु त्यासाठी आम्हाला आसाममध्ये दोन आणि मेघालयमध्ये एक जागा द्यावी लागेल, अशी ऑफर काँग्रेसला देण्यात आलीये. 


आतापर्यंत इंडिया आघाडीच्या किती बैठका पार पडल्या?


इंडिया आघाडीच्या आतापर्यंत चार बैठका पार पडल्या आहेत. यातील पहिली बैठक 23 जून रोजी पाटणा, बिहार येथे झाली. दुसरी बैठक 17 आणि 18 जुलै रोजी बेंगळुरू येथे झाली. तिसरी बैठक 31 आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत झाली. याशिवाय चौथी बैठक डिसेंबरमध्ये दिल्लीत झाली. विरोधी आघाडी भारताच्या चौथ्या बैठकीत पंतप्रधानांचा चेहरा, जागावाटप आणि संयुक्त रॅलीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. काँग्रेस, टीएमसी, जेडीयू, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह अनेक पक्ष यामध्ये सहभागी आहेत. 


हेही वाचा : 


PM Modi in Mumbai : महाराष्ट्राच्या विकासाचं 'अष्टक'; PM मोदी यांनी उद्घाटन, भूमिपूजन केलेलं आठ प्रकल्प कोणते?