अलाहाबाद: केंद्रीय राज्य मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक भाजपसोबत युती करुन लढणार असल्याचे सांंगितले असून, या निवडणुकीत बसपाच्या अध्यक्षा मायावतींविरोधात राखी सावंत निवडणूक मैदानात उतरवणार असल्याचे त्यांनी रविवारी स्पष्ट केले.
आठवले म्हणाले की, ''प्रदीर्घकाळापासून मायावतीं निवडणुकीच्या मैदानात प्रत्यक्ष उतरुन निवडणूक लढण्याचं टाळत आल्या आहेत. तेव्हा आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनी जर उमेदवारी अर्ज दाखल केला, तर त्यांच्या विरोधात रिपाइंच्या महिला आघाडी प्रमुख राखी सावंत निवडणूक लढवतील,''
भाजपसोबतच्या युतीबाबत ते म्हणाले की, ''आम्ही रालोआचे घटक असल्याने, आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत युती करुनच लढवणार आहोत. पण काही कारणामुळे हे शक्य झाले नाही, तर रिपाइं 403 पैकी 200 जागांवर आपले उमेदवार उतरवेल,''
उत्तर प्रदेशातील दलितांना बसपापासून बदल हवा आहे, आणि त्यासाठी रिपाइं समर्थ पर्याय ठरु शकतो. असेही त्यांनी यावेळी सांगितले.