हैदराबाद: तेलंगणातील हैदराबादमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे, ज्यामुळे संपूर्ण देश पुन्हा एकदा हादरला आहे. मेडिपल्लीच्या बालाजी हिल्स उपनगरात एका व्यक्तीला त्याच्या गर्भवती पत्नीची हत्या करून तिच्या शरीराचे अवयव नदीत फेकले आणि तिचे धड घरामध्ये लपवून ठेवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आधीच मुसी नदीत डोके, हात आणि पाय फेकून दिले होते, तर महिलेचे धड त्याच्या घरातून सापडले आहे.

हत्येनंतर, महेंद्रने त्याच्या बहिणीला फोन करून सांगितले...

पाच महिन्यांची गर्भवती असलेली 21 वर्षीय स्वाती हिची शनिवारी सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास तिचा पती महेंद्रने हत्या केली. महेंद्र एका राईड-हेलिंग कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतो. हत्येनंतर त्याने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि काही भाग नदीत फेकून दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हत्येनंतर, महेंद्रने त्याच्या बहिणीला फोन करून सांगितले की त्याची पत्नी बेपत्ता आहे.  त्यानंतर बहिणीला संशय आला आणि तिने एका नातेवाईकाला याबाबतची माहिती दिली, ज्याने तिला पोलिस ठाण्यात नेले. डीसीपी पी.व्ही. पद्मजा यांनी याप्रकरणी माहिती देताना म्हटलं की, चौकशीदरम्यान महेंद्रने हत्येची कबुली दिली.

नदीत टाकलेल्या मृतदेहांचे अवयव शोधले जात आहेत

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. गोताखोरांच्या मदतीने नदीत टाकलेल्या मृतदेहांचे अवयव शोधले जात आहेत, परंतु अद्यापपर्यंत कोणतेही यश मिळालेले नाही. फॉरेन्सिक टीमने महिलेच्या धडावरून पुरावे गोळा केले आहेत आणि ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल. मृत गर्भवती विवाहितेच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचे जावयाशी असलेले संबंध बिघडलेले होते आणि त्यांनी बोलणे बंद केले होते. ते म्हणाले, "माझी मुलगी म्हणायची की सर्व काही ठीक आहे, पण तो तिला सतत त्रास देत असे. त्यालाही माझ्या मुलीला जी शिक्षा दिली तीच शिक्षा मिळायला हवी." पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि जलद तपास आणि कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

प्रेम विवाह ते दुर्दैवी अंत 

महेंद्र आणि बी. स्वाती (B. Swathi) यांनी 20 जानेवारी 2024 रोजी कुकटपल्ली येथील आर्य समाजात प्रेम विवाह (Love Marriage) केला होता. सुरुवातीचे दिवस आनंदात गेले, पण लवकरच घरगुती वाद आणि संशयामुळे त्यांच्या नात्यात कटुता आली. एप्रिल 2024 मध्ये स्वातीने विकाराबाद (Vikarabad) पोलिसांकडे पतीविरोधात हुंडाबळी (Dowry Harassment) ची तक्रारही केली होती. गावातील पंचायतीमध्ये ते प्रकरण सोडवण्यात आलं. मात्र महेंद्रच्या मनातील संशय वाढतच गेला.

हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न 

स्वाती पाच महिन्यांची गर्भवती (Pregnant) असतानाही दांपत्यात भांडणे सुरूच होती. 22 ऑगस्ट 2025 रोजी स्वातीने माहेरी जाणार असल्याचे महेंद्रला सांगितले. ते ऐकून महेंद्र संतापला. त्याने 23 ऑगस्ट रोजी पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेहाचे कुऱ्हाडीने तुकडे (Body Parts) करून डोके, हात, पाय नदीत फेकले, तर धड आपल्या खोलीत लपवून ठेवले.