मुंबई : भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य (India Independence) मिळालं, पण हैदराबाद संस्थान मात्र निझामाच्या (Nizam of Hyderabad) दडपशाहीतच होतं. निझाम मीर उस्मान अलीने पाकिस्तानसोबत संधान बांधून स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न केला. त्याच्या रझाकारांच्या सैन्याने (Razakars) नागरिकांवर अमानुष अत्याचार सुरू केले. अखेर सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांनी ‘ऑपरेशन पोलो’ (Operation Polo) राबवलं आणि केवळ 108 तासांत निझाम गुडघ्यावर आला. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद भारतात सामील झाले आणि हा दिवस हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन (Hyderabad Liberation Day) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात तो मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन (Marathwada Liberation Day) म्हणून साजरा केला जातो.
History Of Hyderabad Nizam State : हैदराबादचा इतिहास
सन 1713 मध्ये मुघल बादशाहने असफ जहाँला निझाम-उल-मुल्क पदवी दिली आणि हैदराबादला पाठवलं. तेव्हापासून निझामशाहीची सुरुवात झाली. नंतरच्या काळात ब्रिटिशांच्या पाठबळामुळे निझाम श्रीमंती आणि सत्ता या दोन्ही बाबतीत प्रबळ झाला.
निझामची गणना त्यावेळच्या जगभरातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत केली जायची. त्याकाळी हैदराबादची स्वतंत्र टेलिकम्युनिकेशन सिस्टिम, स्वतंत्र रेल्वे आणि अर्थव्यवस्था होती. 82,698 चौ.किमी इतकं भलं मोठं क्षेत्रफळ असलेले हैदराबाद संस्थान स्वतंत्र राजसत्तेसारखं वागू लागलं होतं. त्यावेळच्या हैदराबादमध्ये सध्याच्या मराठवाडा प्रांताचाही समावेश होता.
हैदराबादची 80 टक्के जनता ही हिंदू होती आणि 20 टक्के जनता मुस्लिम होती. पण निझामाकडील सर्व उच्च पदे आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये अल्पसंख्याकांना स्थान होतं.
स्वतंत्र राहण्याचा निझामाचा हट्ट
भारत स्वतंत्र झाल्यावर 565 संस्थानांपैकी बहुतांश भारतात सामील झाली. त्यापैकी जुनागड, भोपाळ आणि हैदराबाद वगळता सर्व संस्थानांनी भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला. नंतर जुनागडवर कारवाई करण्यात आली तर भोपाळाने भारतात सामील होत असल्याचं जाहीर केलं. पण हैदराबादने मात्र स्वतंत्र राहणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.
हैदराबादच्या निझामाला पाकिस्तान आणि पोर्तुगालचा छुपा पाठिंबा होता. निझामाने युरोपातून शस्त्रास्त्र खरेदी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. तसेच राष्ट्रकुल देशांमध्ये हैदराबादला सदस्यत्व मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केले. या हालचालींमुळे केंद्र सरकार सावध झालं.
Razakars Of Nizam : रझाकारांचा उच्छाद
निझामाने स्थापन केलेल्या ‘रझाकार’ सैन्याचा म्होरक्या कासिम रिझवी होता. त्याने हैदराबादमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं. नागरिकांवर अत्याचार, हिंदू मंदिरांची तोडफोड, लुटमारी आणि खून अशा घटना रोजच घडत होत्या. 22 मे 1948 मध्ये गंगापूर येथे रझाकारांनी रेल्वे प्रवाशांवर हल्ला करून अनेकांना ठार केलं. यामुळे निझामाविरुद्ध देशभर संताप उसळला.
सरदार पटेलांना धमकी दिली
भारताच्या मध्यभागी असलेला एवढा मोठा प्रदेश स्वतंत्र राहणे, त्याने पाकिस्तानशी संधान साधणे हे भारताच्या दृष्टीने धोकादायक होतं. हैदराबादमधील लोकही भारताच्या बाजूने होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हैदराबाद हे भारतात सामील झालंच पाहिजे यासाठी सरदार पटेल प्रयत्नशील होते.
भारत सरकारने हैदराबादला भारतात सामील होण्याचं आवाहन केलं. पण निझामाने त्याकडे दुर्लक्ष केलं. . नोव्हेंबर 1947 मध्ये दिल्लीत सरदार पटेल आणि कासिम रिझवीची भेट झाली. त्यावेळी रिझवीने 'हैदराबादला हात लावाल तर महागात पडेल' अशी थेट धमकी दिली. त्यावर सरदार पटेल शांतपणे म्हणाले की, “तुम्ही जर आत्महत्याच करायची ठरवली असेल तर आम्ही कसं थांबवणार?”
Operation Polo : 108 तासांची निर्णायक लढाई
अखेर भारताने हैदराबादवर पोलीस कारवाई करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादमध्ये त्यावेळी जगातील सर्वाधिक म्हणजे 17 पोलो ग्राउंड होते. त्यामुळे या कारवाईला 'ऑपरेशन पोलो' असं नाव देण्यात आलं. 13 सप्टेंबर रोजी भारतीय लष्कर हैदराबाद मध्ये घुसलं. त्यावेळी गोरखा बटालियनने जबरदस्त आक्रमण केलं. रझाकारांचे सैन्य जेमतेम 24 हजारांच्या आसपास होतं.
अवघ्या तीनच दिवसात हैदराबादमधील सर्व प्रमुख ठिकणं भारताच्या ताब्यात आली. भारतीय सैन्याच्या आक्रमणापुढे रझाकार तग धरू शकले नाहीत. 17 सप्टेंबर रोजी म्हणजे पाच दिवसांनी निझामाने शरणागती पत्करली. या लढाईत 66 भारतीय सैनिक शहीद झाले, तर 1,373 रझाकार ठार झाले. सरदार वल्लभभाई पटेल यांना ‘भारताचे लोहपुरुष’ म्हटलं जातं. त्यांची दुरदृष्टी आणि ठाम नेतृत्वामुळे हैदराबाद भारतात विलीन झालं.
हैदराबाद आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाचे अध्याय आहेत. रझाकारांचा उच्छाद, निजामाची हट्टी भूमिका आणि सरदार पटेलांचे कणखर नेतृत्व, या तिन्ही घटकांनी इतिहासात वेगळं स्थान निर्माण केलं. आजही 17 सप्टेंबर हा दिवस आपल्याला खऱ्या स्वातंत्र्याची जाणीव करून देतो.
संबंधित बातमी :