Hyderabad Fire: हैदराबादमधील चारमिनारच्या परिसरातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सकाळी चारमिनार (Charminar) परिसरात असणाऱ्या गुलजार हाऊस इमारतीला आग लागली. ही आग वेगाने पसरत गेली आणि तिने भीषण स्वरुप धारण केले. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. परंतु, ही आग ( Fire news) शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. 

हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या रुग्णालयात दुर्घटनेतील आठ जणांना मृतावस्थेत आणण्यात आले. आज सकाळी साडेसहा वाजता अग्निशमन दलाला याठिकाणी आग लागल्याची वर्दी मिळाली. यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केले. सध्या याठिकाणी अग्निशमन दलाच्या 11 गाड्या आग विझविण्याचे काम करत आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा वाढण्याची भीती आहे. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीतून दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने मदत पुरवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जखमींवर चांगल्या पद्धतीने उपचार होतील, याकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ज्या गुलजार हाऊस इमारतीला आग लागली, तो परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे. या भागात दागिन्यांची अनेक दुकाने रांगेत आहेत. हा परिसर ऐतिहासिक अशा चारमिनारपासून जवळच आहे. येथील अनेक दुकानेही शंभर वर्षांपेक्षा जुनी आहेत. हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्याने आग वेगाने पसरत गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

आणखी वाचा

पाण्याचे 100 बंब संपले, तरीही आग विझेना, मालकाच्या कुटुंबाला शोधायला भिंत फोडली, अग्निशमन दलाचे जवान भगदाडातून आत शिरले

PHOTOS: सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत भीषण आग, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू