Himachal Pradesh Khalistan Banners : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर खलिस्तानी झेंडे लावल्याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. हिमाचल पोलिसांनी या प्रकरणात शिख फॉर जस्टिसचे जनरल कौन्सिल गुरपतवंत सिंह पन्नू यांना मुख्य आरोपी घोषित केलं आहे. याप्रकरणी आता एफआयआरही नोंदवण्यात आला आहे, ज्यामध्ये UAPA म्हणजेच दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणे यासह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्याचे आदेश
हिमाचल प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात भादंवि कलम 153-ए, 153-बी आणि UAPA कलम 13 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आरोपींना पकडण्यासाठी आंतरराज्य सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना सीमा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पोलिसांकडून खलिस्तानी समर्थक लपून बसल्याची शक्यता असलेल्या सर्व ठिकाणांवर छापेमारीही सुरु आहे.


काय आहे प्रकरण?
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजेच मेन गेटवर रविवारी खलिस्तानी झेंडे टांगण्यात आले होते. याशिवाय विधानसभेच्यां भिंतींवर काही आक्षेपार्ह मजकूर आणि घोषणाही लिहिण्यात आल्या होत्या. हिमाचल प्रदेश विधानसभा संकुलाच्या मुख्य गेट क्रमांक एकच्या बाहेरील बाजूस खलिस्तानी झेंडे लटकलेलं आढळून आलं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रशासनाने झेंडे हटवले. खलिस्तानी झेंडे हटवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेचा अनेक ठिकाणी निषेध करण्यात आला. 


हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या प्रकरणाचा निषेध केला. त्यांनी या प्रकरणी निषेध करत सांगितले की, 'दोषींवर लवकरच कारवाई केली जाईल. ठाकूर यांनी म्हटलं की, 'हिमाचल सामंजस्यपूर्ण राज्य असून इथे शांतता कायम राहायला हवी. या प्रकरणातील दोषी कुठेही असोत, त्यांना लवकरच पकडले जाईल. दोषींवर नक्कीच कडक कारवाई केली जाईल.'


मनीष ससोदिया यांचा भाजपावर निशाणा
हिमाचल प्रदेशामध्ये भाजपचं सरकार आहे. या प्रकरणावर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. सिसोदिया यांनी म्हटलं आहे की, 'ज्या सरकारला विधानसभेचं संरक्षण करता आलं नाही ते सरकार जनतेचं संरक्षण कसं करेल? हा हिमाचल प्रदेशच्या अब्रूचा आणि देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.'


महत्त्वाच्या इतर बातम्या :