नवी दिल्ली : एनसीआरबी अर्थात राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालामध्ये देशातल्या गुन्हेगारीचा आलेख समोर आला आहे. लॉकडाऊनच्या वर्षात गुन्हेगारीच्या संख्येवर काय परिणाम झाला याचं उत्तर या अहवालातून मिळालंच, सोबत कुठल्या राज्यांत ही आकडेवारी कमी अधिक आहे याचंही चित्र समोर आले आहे.


 देशात दिवसाला रोज 77 बलात्कार तर रोज 80 हत्येच्या घटना घडत आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल अर्थात एनसीआरबीनं नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातली ही धक्कादायक आकडेवारी आहे. राज्यांचा विचार केला तर सर्वाधिक हत्या उत्तर प्रदेशात आणि सर्वाधिक बलात्कार राजस्थानात नोंदवले गेले आहेत. 


 देशातल्या गुन्हेगारीचा आलेख?
   
देशात 2020 या वर्षात हत्येच्या 29 हजार 193 घटना नोंदवल्या गेल्या आहेत. त्यापैकी सर्वात जास्त 3,779 हत्या उत्तर प्रदेशातल्या आहेत. त्यानंतर बिहारमध्ये 3,150 आणि महाराष्ट्रात 2,163 हत्या नोंदवल्या गेल्या आहेत. देशात 2020 या वर्षात बलात्काराचे 28 हजार 46 केसेस नोंदवल्या गेल्यात. त्यापैकी सर्वाधिक राजस्थान तर दोन नंबर केसेस उत्तर प्रदेशातल्या आहेत.  एकूण गुन्ह्यांच्या आकडेवारीत पहिलं स्थान तामिळनाडू, दुसरं केरळ तर तिसरं दिल्लीचं आहे. 


विशेष म्हणजे ही आकडेवारी आहे 2020 या वर्षातली आहे. म्हणजे ज्या काळात देशात कोरोना लॉकडाऊनचं संकट गडद झालं त्या काळातली आहे. मार्च ते मे 2020 या काळात जेव्हा पूर्णपणे लॉकडाऊन होता त्यावेळी बलात्कार, हत्येसारख्या गुन्ह्यांची संख्या अचानकपणे 2 लाखांनी कमी झाली होती. पण एकूण गुन्ह्यांमध्ये सरकारी नियमांच्या उल्लंघनाचे गुन्हेही आहेत. त्यात झालेली वाढ ही एका वर्षातली 28 टक्के इतकी आहे.  राज्यांची तुलना करता उत्तर प्रदेश आणि मेट्रो शहरांचा विचार करता दिल्ली हे गुन्हेगारीत सर्वाधिक आघाडीवर आहेत. 


 मेट्रो शहरांच्या यादीत दिल्लीत सर्वाधिक गुन्हे 


देशातल्या 19 मोठ्या शहरांची मेट्रो शहर म्हणून गणना केली जाते. या सर्व शहरात होणाऱ्या बलात्कारांपैकी 40 टक्के बलात्कार हे एकट्या दिल्लीत  तर एकूण हत्येच्या गुन्ह्यांपैकी 25 टक्के हे दिल्लीतले आहेत.  2019 आणि 2020 या दोन वर्षांची तुलना केली तर बलात्कार, हत्येच्या गुन्ह्यांचं प्रमाण कमीही झालंय. पण हा बदल केवळ लॉकडाऊनमुळे झालेला आहे का हा देखील प्रश्न आहे.  सोबतच ऑनलाईन फ्रॉड, सायबर क्राईमसारख्या आधुनिक शैलीच्या गुन्ह्यांमध्येही वाढ चिंताजनक आहे.