नवी दिल्ली : आय़एनएक्स घोटाळ्य़ाप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या अटकेसाठी सीबीआयसोबतच ईडीची टीम चिदंबरम यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे. परंतु सीबीआयला चिदंबरम यांच्या घरात जाण्याची परवानगी मिळाली नाही. परिणामी सीबीआयच्या पथकाला चिदंबरम यांच्या घराच्या प्रवेशद्वारावरुन (गेवटवरुन), भिंतीवरुन उड्या मारुन घरात प्रवेश करावा लागला आहे. आता कुठल्याही क्षणी चिदंबरम यांना अटक होण्याची शक्यता आहे.


चिदंबरम यांनी त्यांच्या घराचा दरवाजा न उघडल्याने सीबीआयनं अक्षरशः कसरत करुन निवासस्थानाच्या गेटवर चढून निवासस्थानी प्रवेश केला आहे. दरम्यान यामुळे निवासस्थानाबाहेर परिस्थिती चिघळली आहे. त्यामुळे सीबीआयनं दिल्ली पोलिसांना मदतीसाठी बोलवलं आहे. चिदंबरम यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले आहेत. काँग्रेस कार्यकर्ते सीबीआय आणि ईडीच्या कारवाईत अडथळा आणत आहेत. कार्यकर्त्यांनी राडा सुरु केल्यानंतर सीबीआयने दिल्ली पोलिसांकडे मदत मागितली. दिल्ली पोलीस सध्या त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान 27 तासानंतर पी. चिदंबरम काँग्रेस कार्यालयात अवतरले आणि आयएनएक्सप्रकरणी आपल्यावर कुठलाही आरोप नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्याशिवाय आपला आणि आपल्या कुटुंबियांवर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचेही त्यांनी सांगितले.

27 तासांनंतर पी. चिदंबरम माध्यमांसमोर, म्हणाले माझ्यावरील आरोप खोटे

चिदंबरम यांनी अवघी 10 मिनिटं पत्रकार परिषद घेतली. परंतु पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देणं त्यांनी टाळलं. चिदंबरम कार्यालयातून घराकडे निघाले आणि इतक्यात सीबीआयचं पथक काँग्रेस कार्यालयात पोहोचलं. मात्र चिदंबरम सीबीआयच्य़ा हाती लागले नाहीत. उलट ते घरी पळाले. आता त्यांच्या घराबाहेर मोठा राडा सुरु आहे.