Jabalpur Cruise Accident: मध्य प्रदेशातील जबलपूर येथील बर्गी धरणात 30 एप्रिल रोजी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण देशाला धक्का बसला. जोरदार वादळामुळे एक क्रूझ बोट उलटून बुडाली, ज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर 22 जणांना वाचवण्यात आले. या घटनेनंतर, या दुर्घटनेशी संबंधित अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले गेले आहेत. यामध्ये एक भावनिक आणि काळीज कुरतडून टाकणारा फोटो व्हायरल झाला. ज्यामध्ये एक महिलेचं पार्थिव लाईफ जॅकेटमधील पाण्यावर तरंगत असून तिच्या कुशीत लहानगा सुद्धा विसावला आहे. हा व्हायरल झालेला फोटो मध्य प्रदेशातील बर्गी धरणातील क्रूझ बोट अपघाताशी जोडला जात आहे. बोट बुडाल्यानंतर बचाव पथकाला या अवस्थेत सापडलेल्या आई आणि मुलाचा हा शेवटचा फोटो असल्याचा दावा केला जात आहे.

मात्र, पीटीआय फॅक्ट चेकच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. अनेक एआय डिटेक्शन टूल्सनी तो पूर्णपणे बनावट असल्याचे सिद्ध केलं आहे. दरम्यान, जबलपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्पष्ट केले की, "हा फोटो एआय-निर्मित किंवा इतर कोणत्याही स्रोतातून असावा.  त्याचा बर्गी क्रूझ बोट अपघाताशी काहीही संबंध नाही." त्यामुळे व्हायरल फोटोला बर्गी धरणातील अपघाताशी जोडून सोशल मीडियावर खोटा दावा पसरवला जात आहे.

नेमका काय दावा केला जात आहे?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक वापरकर्ते हा फोटो जबलपूरच्या बर्गी धरणावरील क्रूझ बोट अपघाताचा खरा फोटो असल्याचा दावा करत शेअर करत आहेत. या पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, एका आईने तिच्या चार वर्षांच्या मुलाला शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या छातीशी कवटाळून धरले होते आणि दोघांचे मृतदेह एकाच लाईफ जॅकेटमध्ये सापडले होते. 

फोटो अनेक एआय डिटेक्शन टूल्सवर तपासला

व्हायरल दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी, पीटीआयने सर्वप्रथम हा फोटो अनेक एआय डिटेक्शन टूल्सवर तपासला. या टूल्सच्या निकालांमधून फोटो बनावट असल्याचे समोर आले. तपासात असे दिसून आले की, या प्रतिमेमध्ये डिजिटल एडिटिंग किंवा एआय निर्मितीचे घटक असू शकतात. याचा अर्थ असा की, फोटोमध्ये फेरफार केली गेली होती किंवा तो कृत्रिमरित्या तयार केला गेला होता. 

पीटीआयच्या तपासात 'हाईव्ह मॉडेशन' (Hive Moderation) नावाच्या दुसऱ्या एआय डिटेक्शन टूलचा वापर करून फोटो स्कॅन केला. निकालांवरून असे दिसून आले की, फोटो अंदाजे 96 टक्के एआय-निर्मित होता.पीटीआयने 'साइटइंजिन' (SIGHTENGINE) नावाच्या दुसऱ्या एआय डिटेक्शन टूलचा वापर करून फोटो स्कॅन केला. फोटो एआय-निर्मित होता की नाही, याबद्दल ही चाचणी स्पष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचू शकली नाही. या टूलने तो एआय-निर्मित असण्याची शक्यता अंदाजे 48 टक्के असल्याचा अंदाज वर्तवला. 

व्हायरल झालेल्या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी, पीटीआयने 'सिंथआयडी विश्लेषण' (SynthID analysis) आणि 'गुगल जेमिनी' (Google Gemini) वापरून फोटोची अधिक तपासणी केली. या तपासात काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले.

हातातील दोष: मुलाला धरलेल्या हातांचे बारकाईने निरीक्षण केल्यावर काही भागांमध्ये बोटे अस्पष्ट आणि असामान्यपणे जोडलेली दिसतात, तसेच त्वचेचा पोतही अस्पष्ट दिसतो, जी एआय फोटोंमधील एक सामान्य खूण आहे. प्रतिमेतील पाण्याच्या लाटा आणि तरंगणाऱ्या वस्तू (जसे की फुले) नैसर्गिकरित्या असल्याचे दिसत नाही. पाण्याचा प्रवाह काहीसा सपाट आणि विसंगत दिसतो. महिला आणि मुलाच्या त्वचेचा आणि कपड्यांचा पोत अतिशय गुळगुळीत आणि काहीसा चित्रासारखा दिसतो, जे अनेकदा एआय-निर्मित प्रतिमांमध्ये दिसून येते.

पीटीआयने आणखी तपासणी करताना ऑनलाईन शोध घेतला आणि अधिकृत स्रोत तपासले. तेव्हा पीटीआयला जबलपूर जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल, X वरील जबलपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर या व्हायरल प्रतिमेसंदर्भात एक स्पष्टीकरण आढळले. या पोस्टमध्ये, प्रशासनाने स्पष्टपणे म्हटले आहे, "हा फोटो एआय-निर्मित किंवा इतर कोणत्याही स्रोतातून घेतलेला आहे. याचा जबलपूर बर्गी क्रूझ बोट अपघाताशी काहीही संबंध नाही."

काय केला जात होता दावा?

आई आणि मुलाचा फोटो जबलपूरच्या बर्गी धरणावरील क्रूझ जहाज अपघाताचा फोटो म्हणून सोशल मीडियात शेअर केला जात आहे.

पीटीआयचा निष्कर्ष

पीटीआय फॅक्ट चेकच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. तपासात असे दिसून आले की व्हायरल फोटोच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह आहे. अनेक एआय डिटेक्शन टूल्सनी त्याची तपासणी केली असता, तो पूर्णपणे अवास्तव असल्याचे आढळले. दरम्यान, जबलपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्पष्ट केले की, "हा फोटो एआय-निर्मित किंवा दुसऱ्या स्रोतातून आलेला आहे आणि त्याचा बर्गी क्रूझ शिप अपघाताशी काहीही संबंध नाही." 

इतर महत्वाच्या बातम्या