हैदराबाद : झेंडावंदनासाठी खांब उभारताना विजेचा तीव्र धक्का बसून मुख्याध्यापिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तेलंगणातील मेडिकोंडा गावातल्या सरकारी शाळेत हा प्रकार घडला. o
स्वातंत्र्यदिनाची तयारी करण्यासाठी रविवारी मुख्याध्यापिका प्रभावती आणि चार विद्यार्थी शाळेत गेले होते. मुख्याध्यापिकेने शाळेच्या आवारात सजावट करण्यासाठी झेंडे आणले होते. त्याचप्रमाणे चॉकलेट्स आणि गोडाचे पदार्थही त्या घेऊन आल्या होत्या.
ध्वजारोहणासाठी खांब नसल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी एक लोखंडी खांब घेतला. हा खांब उभारताना जिवंत तारांच्या संपर्कात आल्यामुळे प्रभावती यांच्यासह चार विद्यार्थ्यांना विजेचा धक्का बसला.
नागरिकांनी पाचही जणांना तात्काळ रुग्णालयात नेलं असता, प्रभावती यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आलं. तर तिसरीत शिकणारे तिघे आणि पहिलीत शिकणारा एक विद्यार्थी जखमी झाले आहेत.