नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक एचडीएफसीने ऑनलाईन व्यवहारांवरील ट्रान्झॅक्शन चार्ज रद्द केला आहे. तर चेकद्वारे होणाऱ्या विविध व्यवहारांवर चार्ज वाढवण्याची घोषणा एचडीएफसीने केली आहे. 1 नोव्हेंबरपासून हा नियम लागू झाला.
सॅलरी आणि बचत खातेधारकांना आरटीजीएस आणि एनईएफटीच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी 1 नोव्हेंबरपासून चार्ज लागणार नाही, असं बँकेने म्हटलं आहे. ग्राहकांना सध्या आरटीजीएसद्वारे अडीच लाखांपर्यंत व्यवहार करण्यासाठी 25 रुपये आणि पाच लाखांपर्यंतच्या व्यवहारासाठी 50 रुपये चार्ज लागतो.
एनईएफटीद्वारे 10 हजार रुपयांपेक्षा कमी व्यवहारावर 2.5 रुपये, दहा हजार ते एक लाख रुपयांवर 5 रुपये आणि 1 ते 2 लाख रुपये ट्रान्सफर करण्यासाठी 15 रुपये चार्ज लागतो. तर दोन लाख रुपयांपेक्षा अधिक व्यवहारावर 25 रुपये चार्ज आकारला जातो.
बँकेतून आरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहार केल्यास त्यावर चार्ज आकारला जाईल. ग्राहकांना दर वर्षाला 25 पानांचं चेकबुक मोफत मिळेल. मात्र अतिरिक्त चेकबुकसाठी 75 रुपये मोजावे लागतील. खात्यात पैसे नसल्यामुळे चेक बाउन्स झाल्यास 500 रुपयांचा दंड भरावा लागेल. चेक पेमेंट न होताच परतला तर त्यावरील शुल्क 100 रुपयांवरुन वाढवून 200 रुपये केलं आहे.