Accident News: गुरुग्रामच्या जवळच असलेल्या हरियाणातील नूह जिल्ह्यात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरती आज (शनिवारी) सकाळी भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात आत्तापर्यंत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी अपघातातील मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नूह पोलिस ठाण्याच्या फिरोजपूर झिरका सीमेवरील इब्राहिमवास गावाजवळ आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर एका भरधाव पिकअप वाहनाने 11 स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडलं. या भीषण रस्ते अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतांमध्ये 6 महिलांचा समावेश आहे.

महामार्गावर मृतदेहांचे विखुरलेले तुकडे 

आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर स्वच्छता कर्मचारी साफसफाईचे काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एका भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने या कर्मचाऱ्यांना चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये सहा कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि आरडाओरडा सुरू झाली. जवळच्या लोकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत केली. यानंतर पोलिस, रुग्णवाहिका आणि रस्ते सुरक्षा एजन्सीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघाताच्या ठिकाणी थरारक दृश्य निर्माण झालं होतं. महामार्गावर अनेक मृत कर्मचाऱ्यांच्या मृतदेहांचे तुकडे विखुरलेले पडले होते.

चालकाची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपास

हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, पोलिस आणि स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, अपघातानंतर पिकअपचा चालक गाडी जागीच सोडून पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच, एक्सप्रेस वेवर विविध ठिकाणी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातामागील कारणे शोधण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. अपघातातील मृत आणि जखमींची ओळख अद्याप पटलेली नाही, असे पोलिसांनी माहिती देताना सांगितले. ज्या कंत्राटदाराच्या हाताखाली मृत काम करत होते, तो कंत्राटदारही अद्याप पुढे आलेला नाही. कंत्राटदार आल्यानंतर जखमी आणि मृतांची ओळख पटवली जाईल.

मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. अपघातानंतर एक्सप्रेसवेवर बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, पोलिसांना तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली.