हरियाणा: आई आणि 5 वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून नंतर मुलीची हत्या केल्याचा संतापजवक प्रकार हरियाणातील जिंद या ठिकाणी घडला आहे. जिंद येथील एका कचरा वेचणाऱ्या महिलेला तिच्या झोपडीतून ओढून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जबदस्तीने नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. इतकेच नाही, तर नराधमांनी तिच्या पाच वर्षाच्या मुलीवरही लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा घृणास्पद प्रकार हरयाणाच्या जिंदमध्ये समोर आला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पाच दिवसांनंतर 26 एप्रिल रोजी पोलिसांनी या प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह चार आरोपींना अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. 21 एप्रिलच्या रात्री ही भयानक घटना घडली होती. तीन दिवसांनंतर 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला होता. या घटनेनंतर महिलेला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. दोन-तीन दिवसांनी तिने थोडं सावरल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

महिलेचे शेजाऱ्याशी भांडण झालं होतं. त्यानंतर, तिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर ओढून नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. महिलेसोबत ही घटना घडली, तेव्हा तिचा नवरा घरी नव्हता. महिलेला घेऊन ते नराधम कचऱ्याच्या ठिकाणी गेले त्याच ठिकाणी त्या महिलेची मुलगी रडत आणि तिच्या आईला शोधत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ पोहोचली, तेव्हा आरोपींनी तिच्यावरही बलात्कार केला आणि तिचा गळा दाबून खून केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलीचा मृतदेह पुरला होता, परंतु तिच्या आईला शुद्ध आल्यानंतर आणि 24 एप्रिल रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर तो बाहेर काढण्यात आला. हमीद खान (46), शिवा आणि बिरू (दोघेही 18 वर्षाचे) व एका 13 वर्षाच्या मुलाची आरोपी म्हणून ओळख पटली असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

काय प्रकरण आहे?

21 एप्रिलच्या रात्री, शहर पोलीस स्टेशन परिसरातील एका झोपडपट्टीत एका महिलेवर आणि तिच्या पाच वर्षांच्या मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. नंतर मुलीची हत्या करण्यात आली. सकाळी मृत मुलीचे शवविच्छेदन न करताच दफन करण्यात आले. 23 एप्रिल रोजी, सामूहिक बलात्कार पीडितेने बस्ती येथील शिवा आणि हमीदसह चार जणांवर तिच्या मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप केला. 24 एप्रिल रोजी, ड्युटी मॅजिस्ट्रेटच्या देखरेखीखाली, मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि खानपूर पीजीआय येथे पोस्टमॉर्टम करण्यात आला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कॉलनीतील शिवा, हमीद, बिरू यांच्यासह 4 जणांविरुद्ध सामूहिक बलात्कार, खून, अपहरण अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. आरोपींमध्ये अल्पवयीन मुलाचाही समावेश होता.