नवी दिल्ली : दिल्लीतल्या जामिया नगरमधील डीसीबी बँकेच्या एटीएममधून 2000 रुपयांची एक अशी नोट निघाली, ज्या नोटेची अर्धी छपाई झाली होती, तर नोटेचा अर्धा भाग पूर्ण कोरा होता.

जामियानगर परिसरात शादाब चौधरी यांनी आपल्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी डीसीबी बँकेच्या एटीएममध्ये पोहोचले. त्यांनी एटीएममधून पैसे काढल्यानंतर, त्यातील एक नोट पाहून त्यांना धक्काच बसला.

चौधरी यांना या एटीएम मशीममधून जी 2000 रुपयाची नोट मिळाली, त्या नोटेची अर्धी छपाई झाली होती, तर नोटेचा अर्धा भाग पूर्णपणे कोरा होता. ही विचित्र नोट पाहून चौधरी यांनी तत्काळ कस्टमर केअरला संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.

पण कस्टमर केअरकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने, त्यांनी बँकेच्या शाखेत धाव घेतली. यानंतर बँकेने चौधरींची तक्रार नोंद करुन तपास सुरु केला आहे.

दरम्यान, याबाबत दिल्ली पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.