Gyanvapi Masjid Survey : वाराणसी न्यायालयात ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात वाढ करण्याच्या मागणीवर सायंकाळी चार वाजता निकाल सुनावण्यात येणार आहे. याचिकेत सर्वेक्षणासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी मागितला आहे.


सायंकाळी चार वाजता निकाल सुनावण्यात येणार


वाराणसी न्यायालयात ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात वाढ करण्याच्या मागणीवर सायंकाळी चार वाजता निकाल सुनावण्यात येणार आहे. सर्व पक्षकार कोर्टातून बाहेर पडत आहेत. याबाबतचा निर्णय आता न्यायालय संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास सुनावणार आहे. ज्ञानवापी मशीद प्रकरणाबाबत आज दुपारी 2 वाजता वाराणसी न्यायालयात सुनावणीला सुरूवात झाली. यावेळी सर्वेक्षण वाढवण्याची मागणी हिंदू बाजूने करण्यात आली. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयावर मुस्लिम पक्षाचा आक्षेप आहे. कारण न्यायालयाने हरकती न घेता आदेश काढण्यास सांगितले. फिर्यादी सर्वेक्षणात वाढ करण्याची मागणी करत आहे. त्यावर सर्व पक्षांकडून जोरदार चर्चा सुरू आहे.


ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी याआधी मंदीर होते असा दावा करत काही हिंदुत्ववादी संघटनांनी कोर्टात मशिद परिसराच्या सर्वेक्षणाची मागणी केली होती. त्यानंतर मशीद परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले. कोर्ट कमिशनर अजय मिश्रा यांनी सर्वेक्षणातील माहिती माध्यमांसमोर उघड केली. त्यामुळे कोर्टाच्या अहवाल गोपीनयतेचा भंग झाला असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर सायंकाळी झालेल्या सुनावणीत कोर्टाने मिश्रा यांना हटवले. 


वाराणसी कोर्टात ज्ञानवापी मशिदीशी निगडीत तीन याचिकांवर सुनावणी करण्यात आली. दुपारी झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वेक्षण वाढवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने करण्यात आली. तर, मुस्लिम पक्षकारांनी सर्वेक्षण करण्याच्या मुद्यावर कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने या सर्वेक्षणाबाबत दुसरी बाजू न ऐकता एकतर्फी बाजूने निर्णय दिला असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. 


याचिकाकर्त्या सीता साहू, मीनू व्यास आणि रेखा पाठक यांनी कथित शिवलिंगच्या चारही बाजूने असलेले बांधकाम, भिंत हटवण्याची मागणी केली होती. दावा करण्यात आलेल्या शिवलिंगाला सिमेंट आणि दगड जोडण्यात आले असल्याचा संशय याचिकाकर्त्यांनी व्यक्त केला होता.