गुजरातसह जामनगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. पुराच्या कहरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासात 10 इंचांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. टीम इंडियाचा क्रिकेटर रवींद्र जडेजाची आमदार पत्नी रविबा जडेजा (Rivaba Jadeja) जामनगर उत्तर भागात जामनगरीत पोहोचल्या. त्यांनी बचावकार्याची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. सततच्या पावसाने भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत.


जामनगर येथील एसटी बसस्थानकही पाण्याखाली गेले


अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे. पुराचे पाणी खालच्या मजल्यावरील बेडच्या पातळीपर्यंत पोहोचले आहे. अनेक ठिकाणी रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यांवर उभी असलेली वाहने अर्धी पाण्यात बुडाली आहेत. जामनगर येथील एसटी बसस्थानकही पाण्याखाली गेले आहे. तेथे उभ्या असलेल्या निम्म्याहून अधिक बस बुडाल्या आहेत. शहरातील महामार्गावरील एक टोलनाकाही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याचा मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे.






व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पोलिस चौकी वाहून गेल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये लोक पोलीस चौकी बुडाल्याचे बोलत आहेत. रस्त्याच्या कडेला उभी असलेली पोलीस चौकी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे एका ठिकाणाहून वाहून जात असल्याचे दिसून येत आहे. त्या ठिकाणी एवढं पाणी आहे की पार्क केलेली कार पाण्यात बुडताना दिसत आहे.


लोकांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा वापर


पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. अत्यावश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नका, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छमध्ये 29 ऑगस्टपर्यंत असेच हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाटण, मेहसाणा, गांधीनगर, जामनगर वगळता संपूर्ण गुजरातमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या 24तासांत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अहमदाबाद-वडोदरा इंटरसिटी एक्सप्रेस, वडोदरा-अहमदाबाद इंटरसिटी एक्सप्रेस आणि वडोदरा-जामनगर इंटरसिटी एक्सप्रेस गाड्या मुसळधार पावसामुळे प्रभावित झाल्या आहेत. याशिवाय बससेवेवरही परिणाम झाला आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या