Gujarat Assembly Election 2022 Dates : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज (Election Commission Of India) हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची (Himachal Pradesh Assembly Election 2022) घोषणा करण्यात आली. आजच गुजरात विधानसभा (Gijrat Vidhansabha Election) निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र आज गुजरातच्या निवडणुकांबाबत कुठलीही घोषणा करण्यात आली नाही. पुढील आठवड्यात गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता होती. मात्र आता ही शक्यता मावळली आहे.

  


गुजरातमधील राजकीय पक्ष, राज्य निवडणूक आयोगाकडून यासंबंधी माहिती आणि अहवाल मागवण्यात आले होते.  गुजरात विधानसभेचा कार्यकाळ डिसेंबर महिन्यात संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे. गुजरातमधील 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 99 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. आता यंदाच्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गुजरातमध्ये यंदा सत्ताधारी भाजपविरोधात काँग्रेससह आम आदमी पक्ष देखील मोठ्या ताकतीनं मैदानात उतरले आहेत. 


सध्या गुजरातमध्ये एकूण 182 जागा आहेत. बहुमतासाठी 92 जागांची गरज आहे. गुजरातमध्ये सध्या 4 कोटी 46 हजार 956 रजिस्टर्ड मतदार आहेत. 2017 साली झालेल्या निवडणुकीत 69.01 टक्के मतदान झाले. 182 जागा असलेल्या विधानसभा निवडणुकीत 13 जागा अनुसुचीत जागांसाठी, 27 जागा अनुसुचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 


हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांची घोषणा


आज केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरुवात 17 ऑक्टोबरपासून होईल. तर शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.  8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.  


जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग करण्यासाठी प्रयत्न -मुख्य निवडणूक आयुक्त


आम्ही निवडणुका शांततापूर्ण वातावरणात करण्यासाठी कटिबद्ध आहोत. काही गाईडलाईन्समध्ये आम्ही बदल केले आहेत. यासाठी केंद्रीय आणि राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाशी आम्ही चर्चा केली आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटलं आहे. नवीन मतदारांसह वृद्ध आणि ट्रान्सजेंडर मतदारांकडे विशेष लक्ष दिलं जाईल. जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं देखील मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटलं आहे. 


मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, जे मतदार 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, दिव्यांग किंवा कोविडबाधित आहेत, त्यांना फॉर्म 12 डी भरावा लागेल. मतदान केंद्रावर त्यांना सुविधा दिल्या जाणार आहेत. याशिवाय ज्यांना मतदान केंद्रावर जाता येणार नाही, त्यांना घरी मतदान करण्याची सुविधाही असेल, जिथे निवडणूक आयोगाचे अधिकारी घरोघरी जाऊन अशा मतदारांकडून मतदान करुन घेतील.