Hardik Patel Resigns : गुजरातमधील (Gujrat) दिग्गज पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी काँग्रेसचा (Gujrat Congress) राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते नाराज होते. जनता या निर्णयाचे स्वागत करेल याची मला खात्री आहे, असे हार्दिक म्हणाले. राहुल गांधी यांनी 15 दिवसांपूर्वी हार्दिक पटेल यांच्यासोबत चर्चा केली होती. गुजरातमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. ते पुढे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही, मात्र त्यांच्या नुकत्याच आलेल्या वक्तव्यांनुसार ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हार्दिक पटेल यांनी अखेर पक्षाच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. हार्दिक पटेल यांनी ट्विटरवर सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यांचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. जाणून घेऊया हार्दिक पटेल पत्रात नेमकं काय म्हणाले? 


काँग्रेसवर निशाणा साधणारे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी पत्रातून थेट पक्षश्रेष्ठींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "पक्षाचं राजकारण केवळ विरोधापुरतं मर्यादित राहिलं आहे. इतकंच नाही तर हार्दिकनं आपल्या पत्रात CAA-NRC आणि कलम 370 चा उल्लेख केला आहे. त्यांनी पुढे बोलताना लिहिलंय की, "देशाला विरोध नकोय, तर त्यांच्या भविष्याचा विचार करणाऱ्या पर्यायाची गरज आहे. अयोध्येतील श्री रामाचे मंदिर असो, सीएए-एनआरसीचा मुद्दा असो, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणं किंवा जीएसटीची अंमलबजावणी असो, देशाला दीर्घ काळापासून त्यावर तोडगा हवा होता आणि काँग्रेस पक्ष यात अडथळा बनण्याचं काम करत राहिला."



राहुल गांधी-सोनिया गांधींवर थेट निशाणा


काँग्रेस नेतृत्वावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत हार्दिक पटेल यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, "काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये कोणत्याही मुद्द्याबाबत गांभीर्य नसणं ही मोठी समस्या आहे. मी जेव्हा-जेव्हा पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्त्वाला भेटलो, तेव्हा गुजरातच्या लोकांच्या समस्या ऐकण्यापेक्षा त्यांचं लक्ष त्यांच्या मोबाईल आणि इतर गोष्टींकडे जास्त असल्याचं दिसून आलं. ज्यावेळी देश संकटात सापडला, किंवा काँग्रेसला नेतृत्वाची गरज पडली, तेव्हा आमचे नेते परदेशात होते. सर्वोच्च नेतृत्वाच्या लोकांशी असलेलं वर्तन असं आहे की, ते गुजरात आणि गुजरातच्या जनतेचा द्वेष करतात. मग गुजरातच्या जनतेनं त्याला पर्याय म्हणून पाहावं अशी काँग्रेसची अपेक्षा कशी आहे?


आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी गुजरात काँग्रेसला मोठा धक्का 


गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसेच, गेल्या बराच काळापासून हार्दिक पटेल यांची नाराजी असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु होत्या. हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्यामुळे गुजरात काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी बुधवारी राजीनामा दिला. यासंदर्भातील ट्वीटमध्ये पटेल म्हणाले की, "आज मी धैर्यानं काँग्रेस पक्षाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की, माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की, माझ्या या पावलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन."