Continues below advertisement


Gujarat Cabinet Reshuffle अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) वगळता इतर 16 मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामे (Gujarat Ministers Resignation) दिले आहेत. आता त्यांच्या जागी नव्या मंत्र्यांची निवड केली जाणार आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आज सायंकाळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे भेट घेत नव्या मंत्र्यांच्या नावासंदर्भात माहिती देऊ शकतात. उद्या सकाळी साडे अकरा वाजता गांधीनगरच्या महात्मा मंदिरात नव्या मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी एक उच्चस्तरीय बैठक झाली होती. त्यानंतर या मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत.


Gujarat Ministers Resign : गुजरातच्या मंत्र्यांचे राजीनामे, कारण समोर...


भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्तारात 10 नव्या नेत्यांना संधी दिली जाऊ शकते. सध्याच्या मंत्रिमंडळातील काही चेहऱ्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. सध्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 17 मंत्री आहेत. यापैकी 8 कॅबिनेट मंत्री आहेत आणि 8 राज्यमंत्री आहेत. संविधानातील तरतुदीनुसार 182 सदस्यांच्या विधानसभेत 27 मंत्री बनवले जाऊ शकतात.


गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काही दिवसांपूर्वी जगदीश विश्वकर्मा यांना संधी देण्यात आली होती. ते यापूर्वी भूपेंद्र पटेल यांच्या सरकारमध्ये राज्यंमंत्री होते. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा गुजरातला दाखल होत आहेत. सायंकाळी नड्डा मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, सीआर पाटील आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतील. मंत्रिमंडळ विस्तार आणि संघटनात्मक बदलांवर अंतिम शिक्कामोर्तब नड्डा करतील अशी शक्यता आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी एक उच्चस्तरिय बैठक झाली होती. त्या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, सीआर पाटील आणि भूपेंद्र पटेल उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात संघटनात्मक रणनीतीबाबत त्या बैठकीत चर्चा झाली होती.


राजकीय जाणकारांच्या मते भाजप या फेरबदलांद्वारे राज्यातील पक्षात नवी ऊर्जा आणण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षात तरुणांना मोठी जबाबदारी देण्याचे संकेत या माध्यमातून देण्यात आहेत. पाटीदार समुदायासह ओबीसी आणि शहरी वर्गाचं योग्य संतुलन नव्या मंत्रिमंडळात ठेवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.


गुजरातचे राजकीय समीकरण पाहता मंत्रिमंडळातील बदल 2027 ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतला जात आहे. कारण काही वर्षांपासून आम आदमी पार्टीनं पाटीदार समुदायाच्या भागात काम वाढवलं आहे.


भूपेंद्र पटेल यांनी 12 डिसेंबर 2022 ला दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आता ते नव्या मंत्रिमंडळासह 2027 पर्यंत पक्षाचं काम करु शकतात. पुढील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मंत्रिमंडळातील फेरबदल भाजपसाठी महत्त्वाचे आहेत.