(Source: ECI | ABP NEWS)
Gujarat Cabinet Expansion : गुजरातमध्ये नव्या मंत्र्यांची टीम, हर्ष संघवी उपमुख्यमंत्री, क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाच्या पत्नीलाही मंत्रिपद
Gujarat Cabinet Reshuffle : गुजरातमध्ये मुख्यमंत्री तेच आहेत, पण पूर्ण मंत्रिमंडळ बदलण्यात आलं आहे. क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची पत्नीलाही मंत्रिपदाची संधी मिळाली.

गांधीनगर : गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतली असून त्यामध्ये जाती आणि प्रदेश नेतृत्वाचे संतुलन साधण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र दिसतंय. नव्या मंत्रिमंडळात एकूण 25 मंत्र्यांचा समावेश असून त्यापैकी 6 चेहरे हे जुनेच आहेत. हर्ष संघवी यांनी गुजरातचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच जितेंद्र वाघाणी आणि अर्जुन मोढवाडिया यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ गांधीनगर येथील महात्मा मंदिरात पार पडला. या वेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
Cabinet Expansion in Gujarat : रवींद्र जाडेजाची पत्नी मंत्री
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह इतर 24 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. जामनगर उत्तरच्या आमदार रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) यांनाही मत्रिपदाची संधी मिळाली आहे. रिवाबा जाडेजा या प्रसिद्ध क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी आहेत. त्या फक्त 35 वर्षांच्या असून गुजरातच्या सर्वात तरुण मंत्र्यांपैकी एक ठरल्या आहेत.
List of New Gujarat Cabinet Ministers : नवीन मंत्रिमंडळात कोणकोण?
त्रिकम छंगा, स्वरूपजी ठाकोर, प्रवीण माली, ऋषिकेश पटेल, पीसी बरंडा, दर्शना वाघेला, कांतिलाल अमृतिया, कुंवरजीभाई बावलिया, रिवाबा जडेजा, अर्जुन मोढवाडिया, डॉ. प्रद्युम्न वाजा, कौशिक वेकारिया, परषोत्तम सोलंकी, जितेंद्र वाघाणी, रमण सोलंकी, कमलेश पटेल, संजयसिंह महीडा, रमेश कटारा, प्रफुल पानसेरिया, हर्ष संघवी, मनीषा वकील आणि ईश्वरसिंह पटेल.
Caste and Regional Balance Cabinet : जातीय समीकरण साधलं
गुजरातच्या या नव्या मंत्रिमंडळात जाती आणि प्रदेशाचे संतुलन राखण्यात आले आहे. त्यामध्ये 8 पाटीदार, 8 ओबीसी, 4 आदिवासी, 3 अनुसूचित जाती, 1 ब्राह्मण, 1 जैन (हर्ष संघवी) आणि 1 क्षत्रिय (रिवाबा जडेजा) यांना संधी देण्यात आली आहे.
Leaders Dropped from New Cabinet : कोणांना बाहेर ठेवले?
या मंत्रिमंडळातून राघवजी पटेल, बलवंतसिंह राजपूत, कुबेरभाई डिंडोर, मुलुभाई बेरा, भानुबेन बाबरिया, जगदीश विश्वकर्मा, मुकेश पटेल, भीखूसिंह परमार, कुंवरजीभाई हलपति आणि बच्चू खाबर यांना वगळण्यात आले आहे.
Gujarat Elections : 2027 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे पाऊल
हा मंत्रिमंडळ विस्तार आगामी 2027 विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी एक रणनीतिक पाऊल मानले जात आहे. जातीय आणि प्रादेशिक संतुलन राखून भाजपने मजबूत संघ तयार केला आहे.
16 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री पटेल यांच्या मंत्रिमंडळातील सर्व 16 मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर हे नव्याने मंत्रीमंडळ गठीत करण्यात आले.
























