अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. ओपिनियन पोलनंतर आता सट्टा बाजारही आपले अंदाज वर्तवत आहे. एबीपी न्यूजच्या ओपिनियन पोलनंतर सट्टाबाजरानेही गुजरातमध्ये कुणाची सत्ता येईल किंवा कुणाला किती जागा मिळतील, याचे अंदाज वर्तवले आहेत.


सट्टा बाजारानुसार, यावेळीही गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता येईल. मात्र भाजपसाठी हा विजय सोपा नाही. काँग्रेस यावेळी भाजपला जोरदार टक्कर देईल आणि गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जास्त जागांवर विजय मिळवेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपमधील सर्वच बडे नेते गुजरात जिंकण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांची टीमही मोठ्या तयारीने मैदानात उतरली आहे. त्यामुळे दोन्हींकडील ताकद पणाला लागली असल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीला नेहमीपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.

सट्टाबाजारानुसार कुणाला किती जागा?

भाजप - 101 ते 103 जागा
काँग्रेस - 71 ते 73 जागा
इतर - 5 ते 7 जागा

सट्टाबाजारातील हे आकडे सेशनचे आहेत, म्हणजे जर कुणी व्यक्ती भाजपसाठी 101 जागा जिंकण्यावर 1 लाख रुपये लावत असेल आणि भाजप 101 किंवा त्याहून कमी जागा जिंकली, तर पैसे लावणाऱ्या व्यक्तीला 1 किंवा 2 लाख रुपये मिळतील. मात्र जर भाजप 102 किंवा त्याहून जास्त जागा जिंकल्यास ती व्यक्ती पराभूत झाली असे मानले जाईल.

त्याचवेळी, जर कुणी व्यक्ती भाजप 103 जागा जिंकण्यावर 1 लाख रुपये लावत असेल आणि भाजप 103 किंवा त्याहून जास्त जागा जिंकल्यास पैसे लावणाऱ्या व्यक्तीला 2 लाख रुपये मिळतील. मात्र भाजप 102 हून कमी जागा जिंकल्यास पैसे लावणारी व्यक्ती पराभूत मानली जाईल.

अशाच पद्धतीने काँग्रेसवरही सट्टा लावला जात आहे.

भाजप आणि काँग्रेस किती जागा जिंकेल, यावरही सट्टा लावण्यात आला आहे. बुकींच्या आकडेवारीनुसार :

भाजप 110 जागा जिंकल्यास भाव - 1.50 रुपये (म्हणजेच 1 रुपया लावल्यास 2.50 रुपये मिळतील.)
भाजप 125 जागा जिंकण्याचा भाव - 3.50 रुपये
भाजपने 'मिशन-150' पूर्ण केल्यास भाव - 7 रुपये

काँग्रेस 99 जागा जिंकल्यास भाव - 3 रुपये
काँग्रेस 75 जागा जिंकल्यास भाव - 1.10 रुपये

पक्षांच्या जागांसोबतच व्हीआयपी जागांवरही सट्टा लावला जात आहे. ज्या जागांवरुन प्रसिद्ध उमेदवार रिंगणात आहे, तिथेही सट्टा लावण्यात आला आहे आणि हा सट्टा अत्यंत रंजक असा आहे.

राजकोट - 0.40 रुपये भाव (उमेदवार - गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी)
नहलाना - 0.55 रुपये भाव (उमेदवार - गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल)

त्याचसोबत, मांडवीतून शक्ती सिंह गुहिल, पोरबंदरहून अर्जुन मोडावाडिया जिंकण्याचा अंदाज सट्टा बाजारातून वर्तवण्यात आला आहे. तर वडगावमधून जिग्नेश मेवाणी आणि राधनपूरमधून अल्पेश ठाकोर यांचा विजय कठीण असल्याचेही म्हटले आहे.

निवडणुकीच्या काळात सट्टाबाजर प्रचंड सक्रीय होत असतो. गुजरातमध्ये आतापर्यंत 500 कोटींहून अधिक रुपयांचा सट्टा लावण्यात आला असून, मतदानाची तारीख जसजशी जवळ येते आहे, तसे हे आकडे वाढत आहेत.

9 आणि 14 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. 18 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत.