नवी दिल्ली : हेमलकसाच्या जंगलात आदिवासी आणि वन्यप्राण्यांच्या सेवेत रमलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना सध्या आपलं काम सोडून दिल्लीची वारी करण्याची वेळ आली आहे. कारण ज्या वन्यप्राण्यांवर त्यांनी पोटच्या मुलासारखं प्रेम केलं, त्यांच्यावर उपचार केले त्याच वन्यप्राण्यांबद्दलच्या एका सरकारी आदेशाने त्यांच्या कामात अडथळे आणायला सुरुवात केली आहे.
वन्यप्राणी पाळणं हा गुन्हा आहे, मात्र डॉ. प्रकाश आमटे यांनी ज्या सेवाभावी वृत्तीने प्राण्यांची काळजी घेतली आहे, ते पाहता सरकारने वन्यप्राणी अनाथालय म्हणून त्याला मान्यता दिली.
परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांना पुन्हा यासंदर्भात नोटीस येण्यास सुरुवात झाली आहे. वन्यप्राणी पाळल्याचे फोटो, व्हिडीओ क्लिप सगळीकडे व्हायरल होत असल्याने केंद्रीय मंत्रालयाकडून त्याबाबत त्यांना नोटीस पाठवली आहे. वन्यप्राणी पाळून त्याचं असं चित्रीकरण करणं हे नियमबाह्य असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
गेल्या दोन दिवसांपासून याबाबत आमटे दाम्पत्याने विविध मंत्र्यांच्या भेटी घेऊन आपली बाजू स्पष्ट केली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनीही मध्यस्थी करुन पर्यावरणमंत्री हर्षवर्धन यांच्याशी त्यांची भेट घडवून आणली. या भेटीनंतर आपल्याला दिलासा मिळेल अशी आशा आमटे यांनी व्यक्त केली आहे.
कालच सरकारी कारभाराला वैतागून मग मी माझा पद्म पुरस्कार परत करावा का? अशी आर्त सवाल प्रकाश आमटेंनी विचारला होता. 2002 साली माझ्या 'पद्मश्री' पुरस्काराच्या गौरवपत्रात आदिवासींसोबत वन्यजीवांवरच्या सेवेचाही उल्लेख आहे. त्यामुळे मग आता या सेवेचा अडथळा का होतोय असा त्यांचा सवाल होतो. मात्र आज मंत्र्यांच्या भेटीनंतर या प्रश्नी कायमचा तोडगा निघेल अशी आशा त्यांना व्यक्त केली आहे.
हेमलकसामधील प्राण्यांना जंगलात सोडा, प्रकाश आमटेंना नोटीस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Nov 2017 04:03 PM (IST)
वन्यप्राणी पाळणं हा गुन्हा आहे, मात्र डॉ. प्रकाश आमटे यांनी ज्या सेवाभावी वृत्तीने प्राण्यांची काळजी घेतली आहे, ते पाहता सरकारने वन्यप्राणी अनाथालय म्हणून त्याला मान्यता दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -