Goa News : गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये (Goa Medical College) योग्य वागणूक दिली जात नसल्याच्या तक्रारीनंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांनी शनिवारी सकाळी अचानक हॉस्पिटलला भेट दिली. या पाहणीदरम्यान त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी एका डॉक्टरच्या वागणुकीबाबत असमाधान व्यक्त करत डॉक्टरला तातडीने निलंबित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता त्या डॉक्टरच्या निलंबनावर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

Continues below advertisement


याबाबत अधिक माहिती अशी की, मंत्री राणे यांचा गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाहणी दौरा सुरू असतानाच त्यांना एका पत्रकाराचा फोन आला. पत्रकाराने सांगितले की, तो आपल्या नातेवाईकासह गोमेकॉत आला असता तेथील मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) यांनी गैरवर्तन केल्याचे त्याच्या लक्षात आले. तसेच त्याला शहर आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला देण्यात आल्याचेही पत्रकाराने सांगितले. यावर मंत्री राणे यांनी तत्काळ संबंधित डॉक्टरला बोलावून जाहीरपणे जाब विचारला. तसेच गोवा मेडिकल कॉलेजच्या कॅज्युल्टी विभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्या निलंबनाचे आदेश गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांना दिले.


डॉक्टरवर ऑन-कॅमेरा कारवाई, टीकेचा भडिमार


मंत्री राणे आणि डॉ. रुद्रेश यांच्यातील संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात आरोग्यमंत्री डॉ. रुद्रेश यांना उभे राहण्यास, मास्क काढण्यास सांगताना दिसतात. मंत्री राणे म्हणाले, “जे काही स्पष्टीकरण द्यायचे असेल, ते चौकशी समिती किंवा न्यायालयात द्या. तोपर्यंत निलंबन कायम राहील.” त्यांनी डॉक्टरला तात्काळ घरी जाण्याचा आदेश दिला आणि अन्यथा सुरक्षारक्षकांमार्फत बाहेर काढण्याचा इशारा दिला होता. 


वैद्यकीय संघटनांचा निषेध, संपाचा इशारा


मंत्री राणे यांच्या या कारवाईचा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय वैद्यकीय महासंघ यांनी तीव्र निषेध केला. “फक्त एका पत्रकाराच्या तक्रारीवरून डॉक्टरला ऑन-कॅमेरा झापणे आणि त्याला स्वतःची बाजू मांडण्याची संधी न देणे, ही मनमानी आहे,” असा आरोप संघटनांनी केला आहे. डॉक्टरची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करत महासंघाने संपाचा इशारा दिला आहे. तसेच आपत्कालीन विभागात बिगर वैद्यकीय व्यक्तींच्या प्रवेशास मज्जाव करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. 


मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत चर्चा, निर्णयाला स्थगिती


या वादानंतर आरोग्यमंत्री राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्या निलंबनाला स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणात सर्वांसोबत सखोल चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. 


विश्वजित राणे यांचे स्पष्टीकरण 


सोशल मीडियावरून झालेल्या टीकेनंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी रात्री आपले स्पष्टीकरण जारी केले. त्यांनी स्पष्ट केले की, “एका ज्येष्ठ महिलेच्या बाजूने उभा राहिलो कारण तिच्याशी योग्य वागणूक दिली जात नव्हती. त्यामुळे मला संताप आला. मी सीनियर डॉक्टरशी ज्या प्रकारे संवाद साधला, त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतो. अशी घटना पुन्हा घडणार नाही, याची मी हमी देतो.” तथापि, ज्येष्ठ रुग्ण महिलेकडे आवश्यक ती काळजी घेतली गेली नव्हती, म्हणून तिची साथ दिली, आणि त्याबाबत मी माफी मागणार नाही, असेही राणे यांनी ठामपणे स्पष्ट केले.



आणखी वाचा


Nilesh Rane-Nitesh Rane: कोकणात राणे बंधूंमध्ये शाब्दिक युद्ध पेटले; नितेश राणे म्हणाले, निलेश राणे, तुम्ही 'Tax Free'