पणजी : गोव्यातील दाबोळी विमानतळावर काल (30 ऑक्टोबर) 22 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. गोवा कस्टम विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. हे सोने 755 ग्रॅम वजनाचे आहे.

विमानतळावर काल नियमित तपासणीवेळी कस्टम अधिकाऱ्यांना एका आंतरराष्ट्रीय प्रवाशाबाबत संशय आला. तपासणी केली असता त्याच्या एका बॅगमध्ये 755 ग्रॅम वजनाची सोन्याची तीन बिस्किटे आढळून आली. आखाती देशातून हा प्रवासी एअर अरेबियाच्या विमानाने दाबोळीत उतरला होता. अवैध मार्गाने त्याने 22 लाख रुपये किंमतीचे सोने आणले होते. कस्टमच्या अधिकाऱ्यांना संशय आल्यानेच ही तस्करी उघडकीस आली आहे.


कस्टमचे अतिरिक्त आयुक्त टी.आर. गजलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास कस्टम आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

दरम्यान, एप्रिलपासून आतापर्यंत कस्टम विभागाने दाबोळी विमानतळावर केलेल्या कारवाईत 1 कोटी 70 लाख रुपये किमतीचे पावणे सहा किलो सोने जप्त केलेले आहे. शिवाय जवळपास 37 लाखांचे विदेशी चलन आणि 38 लाखांचे व्यापारी साहित्यही जप्त केलेले आहे.