राजस्थानच्या उदयपूरमध्ये काँग्रेस नेत्या आणि माजी केंद्रीयमंत्री गिरीजा व्यास आगीच्या कचाट्यात आल्याने गंभीररित्या जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे. घरातच पूजा करत असताना साडीचा पदर आगीच्या (Fire) झळांमध्ये आल्याने अगोदर त्यांच्या साडीने पेट घेतला. त्यानंतर, त्या पूर्णपणे आगीत भाजल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातानंतर त्यांना तत्काळ उदयपूरच्या अमेरिकन हॉस्पिटलमध्ये (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथील उपचारानंतर आता त्यांना गुजरातमधील अहमदाबाद येथे रेफर करण्यात आलं आहे.
माजी केंद्रीयमंत्री गिरीजा व्यास ह्या आपल्या घरी नवरात्री पूजाची आरती करत असताना गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. पूजा करताना घरात लावण्यात आलेल्या दिव्यामध्ये त्यांच्या साडीचा पदर आल्याने त्यांनी पेट घेतला. घरातील नोकराने ते पाहिल्यानंतर तत्काळ आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, उदयपूर येथील रुग्णालयात गिरीजा व्यास यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर, घटनेची माहिती मिळताच त्यांचे भाऊ गोपाल शर्मा हेही रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर गंभीर जखमी असलेल्या गिरीजा व्यास ह्यांना अहमदाबाद येथे हलविण्यात आले आहे.
मी फार्म हाऊसवर होतो, तेव्हा बहिणी गिरीजा ह्या आगीच्या तावडीत गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर, मी तत्काळ रुग्णालयात पोहोचलो असून गिरीजा यांना अहमदाबादला नेण्यात आल्याची माहिती भाऊ गोपाल शर्मा यांनी दिली. तसेच, बहिण नियमित पूजा-पाठ करत असते, त्यानुसार आजही ती पूजा करत असताना हा अपघात झाल्याचे शर्मा यांनी सांगितले.
गिरीजा यांचा राजकीय प्रवास
दरम्यान, गिरीजा व्यास यांना मोठा राजकीय अनुभव असून काँग्रेस सरकारमध्ये केंद्रीयमंत्रीपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे. सन 1977 ते 1984 पर्यंत उदयपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष होत्या. तर, 1985 ते 90 या काळात त्यांनी आमदारकीही भूषवली आहे. दरम्यान, पर्यटन राज्यमंत्री आणि राज्याच्या महिला काँग्रेस अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे. सन 1991 मध्ये त्या पहिल्यांदा खासदार बनल्या. त्यावेळी, 1991 ते 1993 मध्ये त्यांना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. सध्या, त्या काँग्रेसच्या सदस्या आहेत.
