Cough Syrup Deaths: आपल्या मुलांना जर खोकला सुरू असल्याने कफ सिरप देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कफ सिरप (Cough Syrup) जीवघेणा ठरू शकतो, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये जेनेरिक खोकल्याची औषधे (Generic Cough Syrup) घेतल्यानंतर तब्बल 11 मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर ड्रग कंट्रोलर (Drug Controller) विभागाने तात्काळ कारवाई करत या औषधांच्या वापरावर बंदी घातली असून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. याशिवाय इतर अनेक मुलं या सिरपमुळे गंभीर आजारी पडल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत.
Cough Syrup Kids Death Case : चौकशीसाठी समिती गठीत
यापूर्वीही मध्यप्रदेशातील छिंदवाडामध्ये अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. राजस्थान सरकारने तातडीने तपासासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. विशेष म्हणजे Dextromethorphan Hydrobromide Syrup IP 13.5 mg/5 ml या औषधाच्या 20 हून अधिक बॅचवर बंदी घालण्यात आली असून तपासणी सुरू आहे.
काय आहे Dextromethorphan Hydrobromide Syrup?
1950 च्या दशकात शोध लागलेले हे औषध सुरुवातीला कोडेन (Codeine) याला पर्याय म्हणून वापरले गेले. हे मुख्यत्वे कोरड्या खोकल्यासाठी दिले जाते. याचा प्रभाव म्हणजे खोकल्याचे संदेश मेंदूपर्यंत जाण्यापासून रोखणे, ज्यामुळे रुग्णाला आराम मिळतो. केमिकल प्रोसेसिंग हे औषध तयार केले जाते आणि लहान मुलांना सहजपणे प्यायला यावे म्हणून ते सिरपच्या स्वरूपात दिले जाते.
Generic Cough Syrup News : कोणत्या वयोगटातील मुलांनी हे औषध टाळावे?
अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स (AAP) आणि US FDA ने स्पष्ट केले आहे की, चार वर्षांखालील मुलांना हे औषध देऊ नये. यामुळे श्वसनाचा त्रास, अत्यधिक झोप, चक्कर, फिट्स आणि मृत्यूचाही धोका संभवतो. काही अहवालानुसार दोन वर्षांखालील मुलांना हे औषध अजिबात देऊ नये तर 2 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना मर्यादित प्रमाणात आणि केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच द्यावे. 6 वर्षांवरील व्यक्तींनी देखील डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसारच या औषधाचा वापर करावा असा सल्ला देण्यात आला आहे.
Cough Syrup News : पालकांसाठी सूचना
जर मुलाला किंवा रुग्णाला यापूर्वी लिव्हर (Liver), किडनी (Kidney) किंवा इतर गंभीर आजार असतील, तर हे औषध देण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. पालकांनी बाजारात सहज मिळणारे सिरप मुलांना देण्यापूर्वी त्याची सुरक्षितता आणि डॉक्टरांचा सल्ला जरूर तपासावा.